महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने (माविम) महिला सक्षमीकरणासाठी तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत पुढील टप्प्यासाठी नाशिक व मालेगाव या शहरांची निवड करण्यात आली आहे. यासाठी मूळ राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियानात काही बदल केले असून महापालिकेच्या असहकार्यामुळे रखडलेल्या या अभियानास अखेर सुरुवात झाली आहे.
माविमने ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणाचा विचार रुजावा, यासाठी बचत गटांसह अन्य उपक्रमांच्या माध्यमातून कामास सुरुवात केली. त्याची फलश्रुती नजरेत येत असतांना शहरातील दारिद्र्य रेषेखालील महिलांच्या प्रगतीचा विचार करत सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना बदलून राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान योजनेची आखणी करण्यात आली. त्या अंतर्गत नाशिकमधील झोपडपट्टी परिसरासह अल्पसंख्याकबहुल भागाची निवड करण्यात आली आहे. मालेगाव शहरातही या योजनेची अंमलबजावणी सुरू असून पहिल्या टप्पातील कार्यशाळा नुकतीच पार पडली. या योजनेत पुढील दोन वर्षांत नाशिक व मालेगाव येथे प्रत्येकी ५५० बचत गट तयार होणे अपेक्षित असून त्यासाठी महिलांचे संघटन करण्यास सुरूवात झाली आहे.
प्रती बचत गट १० हजार रुपये असा एकूण ५५ लाखांचा निधी मिळणार असून तो माविमकडे टप्प्याटप्प्याने वर्ग होईल. त्यात माविमला दारिद्र्य रेषेखालील महिलांचे सर्वेक्षण करणे, त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा अहवाल सादर करणे, त्यांना संघटित करून बचत गट स्थापन करणे, सर्वागीण विकासाच्या दृष्टीने त्यांना उद्योजकता प्रशिक्षण देणे आदी कामे अपेक्षित आहे.
माविम स्थानिक तसेच शहर पातळीवर बचत गटांची प्रातिनिधिक स्वरूपात संघटना स्थापन करणार असून या माध्यमातून सर्व पातळीवर संवाद साधला जाईल असे माविमचे जिल्हा समन्वयक अशोक चव्हाण यांनी सांगितले. खरे तर या योजनेचे काम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, महापालिकेच्या चालढकल वृत्तीमुळे ही कामे रखडल्याने योजनेच्या श्रीगणेशाला जवळपास महिनाभर विलंब झाला. माविमने ही कसर भरून काढत प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर देत आता कामाला सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा