नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात ग्रामीण पोलिसांनी सादर केलेल्या आराखड्यात काही बदल सुचवित नव्याने आराखडा सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी मंगळवारी आयोजित आढावा बैठकीत दिले. बैठक अवघ्या काही मिनिटांमध्ये आटोपती घेण्यात आली.२०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याचा उल्लेख नाशिक-त्र्यंबकेश्वर असा करावी की त्र्यंबकेश्वर-नाशिक, हा वाद मिटलेला नसताना आणि त्यातच जिल्ह्यास अद्याप पालकमंत्री न मिळाल्याने कुंभमेळ्याशी संबंधित अनेक निर्णय घेताना प्रशासकीय पातळीवर सावधगिरी बाळगण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रशासकीय स्तरावर बैठकांचे सत्र सुरू असून प्रत्येक विभागाकडून त्यांची तयारी मांडली जात आहे.
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत विभागीय आयुक्त गेडाम यांच्यासमोर ग्रामीण पोलिसांच्या वतीने सिंहस्थ नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये ग्रामीण दलाला आवश्यक मनुष्यबळ, त्यांची निवास व्यवस्था, आवश्यक सुविधा याविषयी चर्चा करण्यात आली.
त्र्यंबकसह सर्वतीर्थ टाकेद या ठिकाणी पर्वणी काळात होणारी गर्दी पाहता सीसीटीव्हीसह अन्य सुविधा देण्याकडे लक्ष वेधण्यात आले. गेडाम यांनी या आराखड्यासंदर्भात ग्रामीण पोलिसांना काही सूचना करुन आराखड्यात बदल करण्यास सांगितले. नाशिक-त्र्यंबकेश्वरसह काही ठिकाणी आठ घाटांच्या रुंदीकरणासंदर्भात सूचना करण्यात आल्या होत्या. त्यासंदर्भातील कामकाजाविषयी विचारणा करुन बैठक आटोपती घेण्यात आली