जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत अवैध धंद्यांशी संबंधित ३७० संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून एक कोटी, ४५ लाख, १८ हजार ५१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैध धंद्यांविषयी माहिती देण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून मदतवाहिनी सुरू करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील दारु अड्डे, जुगार, गुटखा विक्री, अवैध जैवइंधन, वाळू वाहतूक, अग्निशस्त्र बाळगणे याविरुध्द कारवाई सुरु करण्यात आली आहे. हॉटेल, ढाव्यांचीही तपासणी करण्यात येत आहे. याअंतर्गत वेगवेगळ्या प्रकरणात ३२१ गुन्हे दाखल करण्यात आले असून ३७० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अवैध व्यवसायांविषयी कोणाला माहिती मिळाल्यास त्यांनी ६२६२२५६३६३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक उमाप यांनी केले आहे.