ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे वाढते कामकाज लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने प्रत्येक तालुक्यासाठी एक यानुसार १५ उपविभागांची निर्मिती केली. नव्याने निर्माण झालेल्या या नऊ उपविभागांचा अतिरिक्त कार्यभार अस्तित्वातील उपविभागातील उपअभियंता आणि शाखा अभियंत्यांकडे सोपविला गेला. यात ताहाराबाद ग्रामपंचायतीत जलवाहिनी, पाण्याच्या टाकीचे बांधकाम अशी कामे न करता बनावट देयकांच्या माध्यमातून १४ लाखाच्या अपहार प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या वादग्रस्त शाखा अभियंत्याकडे बागलाण उपविभागाची जबाबदारी दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
हेही वाचा >>> शेवटी आईचं काळीज! सिन्नरमध्ये बछड्यांना घेऊन जाताना मादी बिबट्या कॅमेऱ्यात कैद; पाहा VIDEO
ग्रामीण पाणी पुरवठा योजनांतर्गत जिल्ह्यात तब्बल १४४२ कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत. या विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भांडेकर यांची आर्थिक वर्ष संपुष्टात येत असताना बदली झाली. ते जिल्हा परिषदेत अद्याप कार्यरत आहेत. याच काळात उपविभागांचे कार्यभार देण्याचे आदेश जलदगतीने निघाल्याचे दिसत आहे. शासनाने प्रत्येक तालुक्यासाठी एक उपविभाग निर्मितीला हिरवा कंदील दाखविला. ग्रामीण पाणी पुरवठा विभागातंर्गत यापूर्वी पाच उपविभाग होते. शासन निर्णयान्वये प्रत्येक तालुक्यासाठी एक यानुसार १५ उपविभागांची निर्मिती केली जात आहे. नव्याने निर्माण झालेल्या उपविभागाचा कार्यभार उपअभियंता आणि शाखा अभियंत्यांकडे पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आला. वेगवेगळ्या उपविभागांची जबाबदारी सोपविणाऱ्या अधिकाऱ्यांना नव्याने निर्मिलेल्या उपविभागांचे अतिरिक्त कार्यभार देण्यात आले. यात बागलाण उपविभागाचे शाखा अभियंता विनोद पाटकर यांचाही समावेश आहे. त्यांच्याकडे याच उपविभागाचा कारभार सोपविला गेला आहे. म्हणजे एकप्रकारे त्यांना बढती मिळाल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात होत आहे. ताहाराबाद ग्रामपंचायतीत पाणी वितरण व्यवस्था (जलवाहिनी) आणि १५ हजार लिटर क्षमतेची पाण्याच्या टाकीचे बांधकाम झाल्याचे कागदोपत्री दर्शविले गेले. प्रत्यक्षात जुनीच कामे दाखवत बनावट देयके सादर करून अपहार केल्याची तक्रार आहे. या प्रकरणात तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक आणि मोजमाप पुस्तिकेत नोंद लिहिणारे शाखा अभियंता विनोद पाटकर यांच्याविरुध्द जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
हेही वाचा >>> मेट्रो निओचे पंतप्रधान कार्यालयात सादरीकरण ; अंतिम निर्णयाची नाशिककरांना प्रतीक्षा
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर, चांदवड आणि देवळा, पेठ उपविभाग, कळवण उपविभाग, दिंडोरी आणि सिन्नर, निफाड आणि नांदगाव, येवला या उपविभागांचा कार्यभार वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे दिला आहे. नव्याने निर्माण झालेल्या उपविभागासाठी पंचायत समितीच्या स्तरावर ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाच्या बैठक व्यवस्थेसाठी तत्काळ जागा उपलब्ध करण्यास सांगण्यात आले. तसेच उपअभियंत्यांनी पूर्वीच्या उपविभागाकडील आणि उपविभाग क्षेत्राशी संबंधित सर्व अभिलेखे तात्काळ नव्या उपविभागांकडे वर्ग करण्यास सांगण्यात आले आहे.
चौकशी करून कारवाई शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेने नव्याने निर्मिलेल्या उपविभागांची जबाबदारी ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील उपअभियंता आणि शाखा अभियंत्यांकडे देण्यात आली. बागलाण उपविभागातील नियुक्तीबाबत चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले.