जळगाव – प्रसिध्द क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या सुरक्षा व्यवस्थेतील राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) अंगरक्षक जवानाने बुधवारी पहाटे जामनेर येथील निवासस्थानी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या १५ वर्षांपासून राज्य राखीव पोलीस दलाच्या सेवेत असलेले प्रकाश कापडे (३९) यांनी याआधी मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडेही सुरक्षाव्यवस्थेतील अंगरक्षक म्हणून काम केले होते. सध्या ते सचिन तेंडुलकरच्या मुंबई येथील निवासस्थानी सुरक्षाव्यवस्थेत अंगरक्षक म्हणून तैनात होते. आठवडाभरापूर्वी ते जामनेर येथील गणपतीनगर भागातील आपल्या निवासस्थानी परतले होतेे. बुधवारी पहाटे निवासस्थानीच कापडे यांनी स्वतःच्या आत्मसंरक्षण बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. गोळीबाराचा आवाज ऐकताच घरात झोपलेल्या कुटुंबियांनी कापडे यांच्या खोलीकडे धाव घेतली, त्यावेळी ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. ते दृश्य पाहून कुटुंबीय हादरून गेले. मात्र, त्यातून सावरत त्यांनी जामनेर येथील पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत कापडे यांना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. तेथे  वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीअंती मृत घोषित केले.

हेही वाचा >>>नाशिक जिल्ह्यात आज सभांचा धडाका; नरेंद्र मोदींच्या सभेसाठी खास जलरोधक मंडपाची उभारणी

कापडे यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर, तसेच तपासानंतर कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मृत कापडे यांच्यामागे आई-वडील, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. घटनेनंतर कापडे यांच्या निवासस्थानाबाहेर परिसरातील रहिवाशांनी गर्दी केली होती. कापडे हे गोरेगाव (मुंबई) येथे राज्य राखीव पोलीस दलात (एसआरपीएफ) प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar security guard prakash kapde committed suicide amy
Show comments