नाशिक – कुंभमेळ्यात लाखो भाविक पवित्र स्नान करतात. शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आहे. ती अंधश्रद्धा नसून श्रद्धा आहे. यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक आधार आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यात गोदावरी नदी प्रदूषित होऊ नये, यादृष्टीने पुरेपूर काळजी घेतली जाणार आहे, असा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी येथे मनसेच्या वर्धापन दिन मेळाव्यात राज ठाकरे यांनी देशातील एकही नदी स्वच्छ नसल्याचा उल्लेख करुन कुंभमेळ्यात भाविकांनी स्नान केलेल्या नदीचे पाणी कोण प्राशन करेल, श्रद्धेला काही अर्थ आहे की नाही, असे प्रश्न उपस्थित केले. राज ठाकरे यांच्या विधानाचे स्थानिक पातळीवर पडसाद उमटले. साधू-महंतांनी ठाकरे यांना लक्ष्य केले. कुंभमेळा तयारीचा आढावा घेण्यासाठी नाशिक येथे आलेले गिरीश महाजन यांनीही राज यांना प्रत्युत्तर दिले. एकाच वेळी कोट्यवधी लोक आल्यानंतर थोड्याफार प्रमाणात प्रश्न उद्भवतो. स्नान केल्यामुळे पाणी खराब होते असे समजण्याचे कारण नाही. गोदावरी नदीत मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची उभारणी आणि नुतनीकरणास गती देऊन पाणी शुद्ध करण्याचे नियोजन आहे. कुंभमेळ्यात पवित्र स्नानाला धार्मिक आधार आहे. राज ठाकरे यांचे मत वेगळे असू शकते, असे त्यांनी सूचित केले. निर्वाणी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर श्रीमहंत सुधीरदास महाराज यांनी ६५ कोटी लोकांनी कुंभमेळ्यात स्नान केले असून त्यांच्या श्रद्धेचा राज ठाकरे हे अपमान करत असल्याचे टिकास्त्र सोडले. हिंदू धर्मावर टीका करून आपण खूप पुरोगामी, असे ठाकरे यांना वाटत असेल तर तेही चुकीचे असल्याचे महंत सुधीरदास यांनी नमूद केले.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे माझ्या संपर्कात नाही. आमच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातून संपर्क वाढलेला आहे. पूर्वी माझ्याकडे संपर्क करायचे. आता गर्दी एवढी झाली की, महाराष्ट्रातून कोण, कुठे संपर्क करतोय ते समजत नाही, असे गिरीश महाजन यांनी नमूद केले.

रोहिणी खडसेंना राष्ट्रपती उत्तर देतील

महिलांना एक खून करण्याची परवानगी द्या, अशी मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांना राष्ट्रपतीच उत्तर देतील, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. महिला दिनाच्या निमित्ताने खडसे यांनी तो कार्यक्रम घेतला होता. राष्ट्रपतींकडे त्यांनी मागणी केली आहे. त्यामुळे कोणता खून माफ करायचा, कोणता नाही, हा राष्ट्रपतींचा अधिकार असल्याचे महाजन यांनी सांगितले.