नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याला चार वर्षांचा कालावधी असला तरी प्रशासकीय पातळीवर आतापासून तयारी करावी लागणार आहे. आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने मूलभूत सोयी सुविधांसह साधुग्रामसाठी मुबलक जागा उपलब्ध करून द्यावी लागेल. या जागेसंबंधीची प्रक्रिया लवकर सुरु करावी, अशी सूचना विविध आखाड्याच्या साधू-महंतांनी महानगरपालिकेला केली आहे. आगामी सिहंस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, दिगंबर आखाडयांचे महंत श्री भक्तिचरण दास महाराज, महंत रामकिशोरदास शास्त्री महाराज, खाकी आखाड्याचे महंत भगवानदास महाराज, महंत राजारामदास महाराज तसेच आखाडा साधू-महंतांचे समन्वयक तथा निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे आदींनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर यांची भेट घेतली.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक, साधू-महंत नाशिक नगरीत दाखल होतात. त्यांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी मनपा प्रशासनाकडून मोठे नियोजन केले जाते. साधू-महंतांच्या निवासासाठी साधुग्राममधील जागा आखाड्यांना उपलब्ध केली जाते. ही जागा अधिग्रहीत करण्याचा विषय अद्याप पूर्णपणे मार्गी लागलेला नाही. महापालिकेकडे सुमारे ५० एकर जागा मनपाच्या ताब्यात आहे. प्रारंभी सुमारे ३०० एकरहून अधिक जागा संपादित करण्याचा विचार होता. परंतु, त्यासाठीचा खर्च मोठा असल्याने हा विषय प्रलंबित आहे. या भागातील सुमारे ३५० एकर जागा आरक्षित करण्यात आलेली आहे.
हेही वाचा : नाशिक : पंचवटीत शनिवारी पाणी पुरवठा बंद
या भेटीत विविध मुद्यावर चर्चा झाली. आगामी कुंभमेळ्यासाठी मुबलक जागा उपलब्ध करून द्यावी लागेल, असे साधू-महंतांची सूचित केले. २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यास चार वर्षांचा कार्यकाळ असला तरी तयारीला सुरुवात करणे आवश्यक आहे. नियोजित सोयी-सुविधा दृष्टीने आराखडा तयार होणे क्रमप्राप्त आहे. यावेळी आयुक्त डॉ. करंजकर यांनी साधू-महंतांच्या ज्या काही सूचना असतील, त्यांचे स्वागत केले जाईल असे नमूद केले.