नाशिक : तपोवनातील बस डेपो हटवून या भागात शाळा, घरांना परवानगी देऊ नका, भविष्यातील कुंभमेळ्यासाठी कायमस्वरुपी जागा आरक्षित करा, साधूग्राममध्ये आखाडे आणि खालशांना पुरेशी जागा द्यावी, मध्यवर्ती भागातील धोकादायक इमारती हटवाव्यात, गोदावरी नदी कायमस्वरुपी स्वच्छ व प्रवाही राखावी, आदी मागण्या साधू-महंतांनी येथे आयोजित बैठकीत मांडल्या.

कुंभमेळा तयारीच्या अनुंषंगाने राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात साधू-महंतांशी संवाद साधला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महंत डॉ. भक्तीचरणदास महाराज, महंत रामनारायणदास महाराज, महंत कृष्णचरणदास महाराज, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्यासह विविध आखाड्यांचे महंत उपस्थित होते.

भविष्यातील कुंभमेळ्यासाठी कायमस्वरुपी जागेची गरज मांडण्यात आली. गतवेळी १०० खालसे जागा न मिळाल्याने निघून गेले. यावेळी तसे होऊ नये याची काळजी घेण्याची सूचना करण्यात आली. गोदावरीच्या सभोवताली व अमृत (शाही) स्नान मार्ग आणि मध्यवर्ती भागात अनेक धोकादायक इमारती आहेत.

दरवर्षी महापालिका घरमालकांना नोटीस देते. कुंभमेळा पावसाळ्यात असल्याने दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदारी कोण, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. आगामी कुंंभमेळा स्वच्छ व सुरक्षित होण्याच्या दृष्टीने सर्वांचा सहभाग आवश्यक असून ही एक सामूहिक जबाबदारी आहे. सर्वांच्या सहकार्यातून कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडला जाईल, अशी ग्वाही महाजन यांनी दिली.

कुंभमेळा नियोजनाच्या दृष्टीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शुक्रवारी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे साधू, महंतांशी चर्चा केली. त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या. गर्दी, कुशावर्त कुंड स्वच्छता, साधुग्रामची जागा अशा अनेक विषयांवर बैठकांमध्ये चर्चा झाली.

पाणीसाठा उपलब्धतेसाठी नियोजन

भाविकांची संख्या तिप्पट व चौपट होण्याची शक्यता आहे. त्यावेळी पावसाळा असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुरक्षितेचे अधिक काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. कुंभ पर्वणी काळात महंत आणि भाविकांच्या स्नानासाठी नदीपात्रातील पाणी स्वच्छ व वाहते ठेवण्याच्या दृष्टीने पर्यायी पाणीसाठा उपलब्ध करण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे महाजन यांनी सांगितले.