मालेगाव : भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी येथे संत संमेलन आयोजित करण्यास उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांना मालेगावात येण्यास समाजवादी पक्षाने कडाडून विरोध दर्शविल्याने तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे कारण देत पोलिसांनी संमेलनास परवानगी नाकारली होती.

सकल हिंदू समाजातर्फे गुढीपाडव्यानिमित्त येथील यशश्री कंपाउंड मैदानात संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा हिंदूवीर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. संमेलनात संग्रामबापू भंडारे, स्वामी भारतानंद सरस्वती, मिलिंद एकबोटे आणि जैन संत नीलेशमुनी महाराज हे धर्म जनजागृती आणि प्रबोधन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. हे संमेलन दिमाखदार होण्यासाठी महिनाभरापासून आयोजकांतर्फे जोरदार तयारी सुरू आहे.

मात्र, पोलीस प्रशासनाने संमेलनाला ऐनवेळी परवानगी नाकारल्याने आयोजकांतर्फे राहुल बच्छाव यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. नागपूर येथे झालेली दंगल, औरंगजेबची कबर काढण्यावरून राज्यात सुरू असलेला वाद तसेच सोमवारी येणारा रमजान ईदचा सण या पार्श्वभूमीवर संमेलन घेण्यास परवानगी देऊ नये, अशी भूमिका प्रशासनातर्फे मांडण्यात आली. न्यायालयाने, वक्त्यांची प्रक्षोभक भाषणे होणार नाहीत, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच रविवारी सायंकाळी पाचपूर्वी हे संमेलन पार पाडावे, या अटींवर संमेलन आयोजनास परवानगी दिली. आयोजकांनी पोलिसांकडे प्रतिज्ञापत्र सादर करावे, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.