नाशिक : लोकसभेच्या नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही जागा लढण्याची तयारी सकल मराठा समाज करत आहे. नाशिकमध्ये मराठा समाजाचा उमेदवार दिला जाईल तर, दिंडोरी राखीव मतदार संघात समाजाकडून उमेदवार पुरस्कृत करण्याचा विचार आहे. नाशिक लोकसभेसाठी चार-पाच जण इच्छुक असून याबाबत निर्णय घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे.
मनोज जरांगे यांच्या सूचनेनुसार सकल मराठा समाजाची पंचवटीतील संभाजीनगर रस्त्यावरील शेवंता लॉन्स येथे बैठक पार पडली. यावेळी नाशिक, दिंडोरी लोकसभा निवडणूक लढवायची की नाही, यावर चर्चा होऊन काही ठराव करण्यात आले. याआधी मराठा समाजाने नाशिक मतदारसंघात ५०० उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. त्याऐवजी आता एकच उमेदवार उभा करण्याची तयारी होत असल्याचे बैठकीतून स्पष्ट झाले. यावेळी दोन्ही मतदार संघातील इच्छुक उमेदवार उपस्थित होते. यात शिवसेना ठाकरे गटाकडून तिकीट न मिळाल्याने बंडखोरीच्या तयारीत असलेले विजय करंजकर यांचाही समावेश होता. ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे, महायुतीचे इच्छुक हेमंत गोडसे हे अनुपस्थित होते. बैठकीतील निर्णयांची माहिती नाना बच्छाव आणि करण गायकर यांनी दिली.
हेही वाचा…नाशिक: लहान गावांच्या थांब्यांना बससेवेची हुलकावणी
सकल मराठा समाजाकडून नाशिक लोकसभेसाठी बच्छाव, गायकर, नेहा भोसले, डॉ. सचिन देवरे अशा काही जणांनी निवडणूक लढण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यांच्या समर्थकांनी त्यांची बाजू मांडली. बैठकीत समाजाचा उमेदवार द्यायचा की नाही, याची चाचपणी करण्यात आल्याचे चंद्रकांत बनकर यांनी सांगितले. इच्छुकांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी अनुभवी व्यक्ती, जे कुठल्याही पक्ष व संघटनेशी संबंधित नाहीत, अशा सात जणांची समिती स्थापन करण्याात आली. समितीकडून जे नाव अंतिम होईल, ते मनोज जरांगे यांच्याकडे पाठविले जाईल. मुळात निवडणूक लढवायची हे अद्याप निश्चित नाही. राजकीय घडामोडी लक्षात घेऊन पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल, असे बनकर यांनी म्हटले आहे.
यंदाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी मराठा समाजाकडे पाठिंबा मागू नये. यावेळी त्यांनी समाजाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा गायकर यांनी व्यक्त केली. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळ यांचा बक्षीस म्हणून महायुतीकडून नाशिकच्या जागेसाठी विचार होत असल्याचा आरोप गायकर यांनी केला. हे मनसुबे उधळून लावले जातील. जातीय विष पसरवणाऱ्या भुजबळांना निवडणुकीच्या माध्यमातून हद्दपार केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. बच्छाव यांनी निर्णायक भूमिका घेऊन सामान्य मराठा उमेदवार उभा करून निवडून आणला पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या एकाही आमदाराने मराठा आरक्षणावर भूमिका मांडली नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल रोष असल्याचे नमूद केले.
हेही वाचा…महानिर्मितीच्या भरती परीक्षेत गैरप्रकार, दोन उमेदवारांसह चौघांविरोधात गुन्हा
लढणाऱ्याचा विचार करा
मराठा समाजाचा उमेदवार निवडताना मागील काही वर्षात समाजासाठी केलेले काम लक्षात घेणे आवश्यक आहे. सातत्याने आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला संधी देण्याची मागणी काही इच्छुकांनी केली.