लक्ष्मीपूजनच्या दिवशी फटाक्यांचे प्रमाण घटले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : दरवर्षी अनुभवण्यास मिळणारी पाच ते १० हजाराच्या फटाक्यांच्या माळांची धूम, फॅन्सी प्रकारांचे वेगळेपण अन् अवकाशातील आतषबाजी यावर न्यायालयीन निर्णय आणि पोलीस यंत्रणेच्या इशाऱ्याचा चांगलाच परिणाम झाल्याचे लक्ष्मीपूजनच्या दिवशी पाहावयास मिळाले. फटाके वाजले, नियमांचे उल्लंघनही झाले. सायंकाळी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आसमंत विविधरंगी फटाक्यांनी उजळून निघाला. प्रकाशोत्सवातील लखलखीतपणा दिसला. मात्र नेहमीची दिवाळी आणि यंदाची दिवाळी यात विलक्षण फरक अधोरेखीत झाला. भल्या सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सहन करावा लागणारा फटाक्यांचा आवाज बराचसा क्षीण झाल्याचे जाणवले.

बुधवारी भल्या पहाटेपासून सर्वाची लगबग सुरू झाली. ग्राहकांनी फुललेल्या बाजारपेठेतील गर्दी दुपारनंतर कमी होऊ लागली. व्यापारी, व्यावसायिकांसाठी लक्ष्मीपूजनाचे सर्वाधिक महत्व. त्याची जय्यत तयारी त्यांनी आधीच केली होती. सकाळपासून फुलांनी सजविलेली दुकाने सायंकाळी दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाली. वर्षभराचा जमा-खर्च मांडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खतावण्या, चोपडय़ा, संगणक याबरोबर धनाचे विधिवत पूजन करण्यात आले. कारखाने, बँका, व्यापारी आस्थापना, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी यंत्रसामग्रीचे विधीवत पूजन करण्यात आले.

लक्ष्मीपूजनासाठी लाभलेला मुहूर्त साधण्याकडे प्रत्येकाचा कल होता. घरोघरी केरसुणीची लक्ष्मीच्या स्वरूपात पूजा करण्यात आली. पूजन झाल्यानंतर बाल गोपाळांसह थोरा मोठय़ांपर्यंत सारेच फटाके उडविण्यात मग्न झाले. प्रमुख बाजारपेठांमध्ये दरवर्षी पाच ते १० हजारांच्या माळांवर अधिक भर असतो. निवासी भागात आवाजापेक्षा फॅन्सी प्रकारांना पसंती दिली जाते. यंदा नियमांची भलीमोठी यादी प्रसिद्ध झाली होती. वेळेच्या र्निबधासोबत कोणत्या फटाक्यांना प्रतिबंध आहे, फटाक्यांच्या प्रकारानुसार किती डेसीबल आवाज ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणारा ठरेल याविषयी सविस्तर माहिती देऊन यंत्रणांनी कारवाईचा इशारा दिला होता. त्याचा परिणाम लक्ष्मीपूजनच्या दिवशी फटाके उडविण्यावर झाल्याचे निदर्शनास आले. मोठय़ांनी वेळेच्या मर्यादेत फटाके उडविले. युवा वर्गाने नियमांकडे डोळेझाक करत आतषबाजी करण्यात धन्यता मानली. दरवर्षी फटाक्यांचा जसा जोर असतो, त्यात यंदा कमालीचा फरक पडल्याची अनेकांची प्रतिक्रिया होती.

आवाजाच्या तीव्रतेचे मापन प्रगतिपथावर

दिवाळीच्या कालावधीत आवाजाच्या तीव्रतेचे मोजमाप करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रात ध्वनी पातळी मोजण्याचे काम हाती घेतले आहे. यंदा फटाके उडविण्यासाठी रात्री आठ ते १० या कालावधीत परवानगी असल्याने नेहमीपेक्षा या दोन तासात अधिक ध्वनी, वायू प्रदूषण होण्याची शक्यता व्यक्त केली गेली. त्या अनुषंगाने मंडळ खासगी संस्थेच्या मदतीने ध्वनी प्रदूषणाचे मापन करीत आहे. दिवाळीआधी हवेतील प्रदूषणाचे मापन करण्यात आले. दिवाळीनंतर पुन्हा हवेतील प्रदूषणाचे मापन करून तुलनात्मक अभ्यास केला जाईल. सध्या ध्वनी प्रदूषणाचे नमुने संकलित केले जात आहे. दिवाळीनंतर १५ ते २० दिवसात त्यासंबंधीचा अहवाल मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे क्षेत्रीय अधिकारी सौजन्या पाटील यांनी सांगितले.

 

 

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sale of crackers drops on the day of laxmi pujan