नाशिक: शहरातील महात्मा गांधी रस्त्यांवरील भ्रमणध्वनी दुकानांमध्ये ॲपल या नामांकित कंपनीच्या बनावट भ्रमणध्वनी साहित्याची विक्री होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. पाच दुकानांमधून ॲडॉप्टर, बॅक पॅनल आदी मोठ्या प्रमाणात बनावट साहित्य जप्त करण्यात आले. गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकने ॲपल कंपनीने नियुक्त केलेल्या प्रतिनिधींच्या समवेत ही कारवाई केली. दुकानांची छाननी सुरू झाल्यानंतर आसपासची भ्रमणध्वनी दुकाने एकापाठोपाठ एक बंद झाली.
शहरात महात्मा गांधी रस्त्यावर भ्रमणध्वनी साहित्याची विक्री करणारी सुमारे शंभरहून अधिक दुकाने आहेत. या ठिकाणी साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होते. रस्त्यावर अस्त्याव्यस्त लावल्या जाणाऱ्या वाहनांमुळे वाहनधारकांना दिवसभर वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. याच बाजारपेठेत नामांकित कंपन्यांच्या नावे बनावट भ्रमणध्वनी साहित्याची विक्री होत असल्याचे उघड झाले आहे.
आणखी वाचा-नाशिक: सिटीलिंक रडतखडत रस्त्यावर, देयके रखडल्याने बस पुरवठादार सेवा थांबविण्याची शक्यता
या संदर्भात ॲपल कंपनीने नियुक्त केलेल्या प्रतिनिधींना माहिती मिळाली होती. त्या आधारे संबंधितांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या मदतीने या भागातील शिवम सेल्स, शिवशक्ती, प्रवीण, पटेल आदी दुकानांची छाननी सुरू केली. याची कुणकुण लागल्यानंतर आसपासच्या विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद केली. खरेदीसाठी आलेले ग्राहक नेमके काय सुरू आहे हे पाहण्यात दंग झाले. त्यामुळे बघ्यांची गर्दी झाली. पाच दुकानांमधून ॲपल कंपनीच्या नावाने विकल्या जाणाऱ्या विविध प्रकारचे बनावट साहित्य जप्त करण्यात आल्याचे युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी सांगितले.