लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव : शहरातील सराफ बाजारात दरवर्षी गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत असते. कोट्यवधींच्या उलाढालीमुळे उत्साहाने ओसंडून वाहणाऱ्या सराफ बाजारात दरवर्षीच्या तुलनेत उच्चांकी दरवाढीमुळे यंदा १५ ते २० टक्क्यांनी कमी विक्री झाली.
सराफ बाजारात शुक्रवारी उच्चांकी ९२ हजार ३९१ रुपयांपर्यंत पोहोचलेल्या सोने दराने दुसऱ्या दिवशी शनिवारी ९२ हजार ५९७ रुपयांपर्यंत मजल मारत आणखी एक नवा उच्चांक केला. रविवारी नवीन सोने दर जाहीर होत नसल्याने, गुढी पाडव्याच्या दिवशी शनिवारचेच दर कायम राहिले. साडेतीन मुहुर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या गुढी पाडव्याच्या सणाला सुवणई दागिन्यांची खरेदी शुभ मानली जाते. परिणामी, गुढी पाडव्याला नेहमीच्या विक्रीपेक्षा तीन ते चारपट जास्त दागिन्यांची विक्री सराफ बाजारात दरवर्षी होत असते. त्यामुळे ग्राहक गुढी पाडव्याला सोने खरेदीसाठी सराफ बाजाराकडे वळतील, अशी आशा सुवर्ण व्यावसायिकांना होती.
मात्र, उच्चांकी दरवाढीच्या पार्श्वभूमीवर अपेक्षित सोने विक्री गुढी पाडव्याच्या दिवशी होऊ शकली नाही. एरवी दरवर्षीच्या गुढी पाडव्याला जेवढी सोन्याच्या दागिन्यांची विक्री होते, त्यापेक्षा १५ ते २० टक्क्यांनी कमी विक्री यंदा झाली. उच्चांकी दरवाढीनंतर आपल्या आर्थिक कुवतीनुसार कमी वजनाचे दागिने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा राहिल्याने सोने विक्रीतून होणाऱ्या आर्थिक उलाढालीवर फार परिणाम झाला नाही. परंतु, ग्रॅममध्ये बोलायचे झाल्यास गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या गुढी पाडव्याला सोने विक्री मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.
उच्चांकी दरवाढीच्या पार्श्वभूमीवर, गुढीपाडव्याला सोने विक्रीतून झालेली आर्थिक उलाढाल गेल्या वर्षी इतकीच दिसत असली, तरी वजनातील व्यवहारात सोने विक्रीवर अधिक परिणाम झाला आहे. -आदित्य नवलखा (सुवर्ण व्यावसायिक, जळगाव)