नाशिक: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधुम सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविरुध्द तडिपारीची नोटीस बजावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिक येथे झालेल्या शिंदे गटाच्या मेळाव्यात पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी बडगुजर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. कुख्यात दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्याबरोबर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बडगुजर यांनी केलेल्या पार्टीच्या चित्रफिती यापूर्वीच शिवसेना शिंदे गटाने उघड केल्या होत्या. मेळाव्यात ’सलीम कुत्ता‘ याच्या नावाने शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली होती. पालकमंत्री दादा भुसे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री लक्ष घालतील, असे म्हटले होते. दुसऱ्याच दिवशी बडगुजर यांच्याविरोधात तडिपारीची कारवाई सुरू झाल्याचे दिसत आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे आणि शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांच्यात लढत होत आहे. दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. त्या अंतर्गत बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिक दौरा पार पडला. शिंदे गटात सहभागी झालेले विजय करंजकर यांनी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून तिकीट न मिळाल्याचे खापर बडगुजर यांच्यावर फोडले होते. शिवसैनिकांनी मेळाव्यात बडगुजर यांच्या विरोधात सलीम कुत्ता अशी घोषणाबाजी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कुत्र्याचा अवमान होईल, असा टोला हाणला होता. पालकमंत्री दादा भुसे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणात लक्ष देतील, असे आश्वासन शिवसैनिकांना दिले होते. ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या सर्वांचा बडगुजरांवर रोष आहे. बडगुजर हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.
हेही वाचा : गंगापूर धरणातील गाळ उपशाचे काम थांबविण्याचा निर्णय
शहर पोलिसांची तडिपारीची बजावलेली नोटीस स्वीकारण्यास बडगुजर यांनी नकार दिल्याचे सांगितले जाते. गुरुवारी ते पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी दाखल झाले. कुख्यात दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्यासोबत बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप सत्ताधारी आमदारांनी केल्यावर सरकारकडून एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. बनावट कागदपत्रे सादर करून महानगरपालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. मनपाच्या तत्कालीन आयुक्तांच्या पत्राच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माजी नगरसेवक बडगुजर यांची चौकशी केली होती. या प्रकरणात बडगुजर जामिनावर आहेत. कधीकाळी महापालिकेत ठेकेदार म्हणून वावरणारे बडगुजर सध्या शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख आहेत. खासदार संजय राऊत यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जातात. या संबंधांमुळे आजवर त्यांना पक्षासह महानगरपालिकेत अनेक महत्त्वाच्या पदांवर संधी मिळाली. नाशिक लोकसभेच्या प्रचाराची धुरा ते सांभाळत आहेत.