जळगाव : हिंदू आणि मुस्लिम यांच्यात धार्मिक द्वेष निर्माण करू नका, महात्मा गांधीजींविषयी आक्षेपार्ह भाष्य करू नका आणि त्यांच्या खुन्यांचे कौतुक करू नका, केंद्र सरकारमध्ये मुस्लिमांनाही स्थान द्या, मुस्लिम बांधवांनाही परिवार माना, यांसह इतर अटी-शर्ती मान्य झाल्यास भाजपबरोबर जाण्याचा विचार करण्यात येईल. भाजपकडून दोनवेळा आमंत्रण आले आहे, असा दावा समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नाशिक : कपालेश्वर मंदिराजवळील रस्त्यांवर वाहतूक बंद

संविधान वाचवा- देश वाचवा यात्रेच्या निमित्ताने आझमी हे गुरुवारी जळगाव दौर्यावर होते. जामनेरमध्ये त्यांची शेवटची सभा झाली. मिल्ली तहरीक फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमास जाण्यापूर्वी जळगावात आझमी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांमुळे शेतकरी, कष्टकरी, गोरगरिबांसह अल्पसंख्याकांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला. देशभरातील शेतकरी आज संकटात असून, महाराष्ट्रात जुलै २०२३ पासून तीन हजारांवर शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकर्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारकडे कोणतेही धोरण नाही. देशावरील कर्ज चारपटीने वाढले, तर दुसरीकडे उद्योगपतींचे १४ लाख कोटी कर्ज सरकारने माफ केले.

हेही वाचा >>> त्र्यंबकेश्वरसाठी महाशिवरात्रीनिमित्त आजपासून जादा बससेवा

सरकार संविधानाच्या विरोधात आहे. सर्वत्र गुन्हेगारी वाढली आहे. या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करून देशात हिंदू- मुस्लिम बांधवात दरी निर्माण करून धार्मिक द्वेष पसरविण्याचे काम सुरू आहे. सरकार द्वेषयुक्त भाषणे रोखू शकले नाहीत. देशातील न्यायालयाचे निर्णयही भावनिक व आस्थेच्या नावावर दिले जात असतील, तर या देशातील अल्पसंख्यांक असलेल्या मुस्लिमांना कधीच न्याय मिळणार नाही. त्यामुळे आम्ही द्वेषाच्या विरोधात हिंदू- मुस्लिम एकतेसाठी लढाई लढत आहोत, असे आझमी यांनी नमूद केले. महाराष्ट्रात समाजवादी पक्ष आगामी निवडणुकांत स्वतंत्र असून, आमची कोणाशीही युती नाही. लोकसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष उमेदवारांना आम्ही पाठिंबा देऊ, त्यांच्याबरोबर राहू, अशी भूमिका असल्याचे आझमी यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samajwadi party leader abu asim azmi claim bjp offer him to join party zws