नाशिक – मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणात स्थान द्यावे, अशी मागणी होत असताना आणि त्यास आक्षेप घेतल्यावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना लक्ष्य केले जात असताना आता भुजबळ संस्थापक अध्यक्ष असलेली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ओबीसींचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. परिषदेने उत्तर महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण अधिकार महामेळावे घेण्याचे जाहीर केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळवारी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष दिलीप खैरे यांच्या अध्यक्षतेखाली धुळे येथे धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्याची आढावा बैठक झाली. ओबीसींच्या आरक्षणाला बाधा आणण्याचा प्रयत्न होत आहे. ओबीसींचे हे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी सर्व ओबीसी घटकांना एकत्रित करून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. यासाठी समता परिषदेने या महामेळाव्यांचे आयोजन केल्याचे खैरे यांनी म्हटले आहे. तर उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी ओबीसी समाजातील सर्व जाती समुदायाना मेळाव्यात सहभागी करून घेण्याचे आवाहन केले.

हेही वाचा – धुळे : मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गुटखा तस्करी; शिरपूर तालुक्यात मुद्देमाल जप्त

हेही वाचा – नाशिकमध्ये मायटेक्स्पो २०२३ प्रदर्शनाच्या तयारीला वेग, महाराष्ट्र चेंबरचा पुढाकार, तीनशेपेक्षा अधिक दालनांची व्यवस्था

१९ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत उत्तर महाराष्ट्रात हे महामेळावे होतील. १९ तारखेला भडगाव, २० ऑक्टोबर रोजी धरणगाव, २१ ऑक्टोबर रोजी भुसावळ, २२ तारखेला धुळे आणि २९ ऑक्टोबरला नंदुरबार येथे मेळावा होणार आहे. यावेळी समता परिषदेचे धुळे जिल्हाध्यक्ष राजेश बागूल, जळगाव जिल्हाध्यक्ष सतीश महाजन, नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, माजी महापौर भगवान करंजकाळ, कार्याध्यक्ष वसंत पाटील, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून वाद सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांनी भूमिका बदलायला हवी, असे मत व्यक्त केले होते. यावर भुजबळांनी प्रतिक्रिया देताना मराठा आरक्षणाच्या विषयात केवळ आपणास का लक्ष्य केले जाते, असा प्रश्न उपस्थित केला. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, ही भूमिका आपली एकट्याची नाही. तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्वपक्षीय नेत्यांची असल्याचे स्पष्ट केले होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samata parishad for obc rights will hold meetings in north maharashtra ssb