केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षावरील दाव्यावर अखेर निर्णय दिला आहे. यानुसार आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यावर माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय लोकशाहीचा भाग आहे. ज्यांना जे चिन्ह मिळालं त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, पण माझ्या दृष्टीने चिन्ह आणि नाव कुणाला मिळालं याचं लोकांना किती देणंघेणं आहे हे माहिती नाही. आमचे प्रश्न कधी सुटणार इतकंच लोकांना जाणून घ्यायचं आहे. मागील दोन तीन वर्षातील अस्थिर सरकारमुळे लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय प्रक्रियेचा भाग आहे.”

“मी अनेक प्रश्न घेऊन सरकारकडे जातो, तेही अद्याप सुटले नाहीत”

“माझी सरकारला विनंती असणार आहे की, त्यांनी लोकांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावे. मी अनेक प्रश्न घेऊन सरकारकडे जातो. ते प्रश्नही अद्याप सुटलेले नाहीत. पक्षाचं नाव आणि चिन्हा हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्याच्याशी स्वराज्य संघटनेचा काहीही संबंध नाही. स्वराज्यच्या वतीने आमच्या त्यांना शुभेच्छा,” असं मत संभाजीराजेंनी व्यक्त केलं.

“आमदार-खासदारांच्या बळावर थेट पक्षावर दावा होत असेल, तर छोट्या पक्षांचं कसं होणार?”

संभाजीराजे छत्रपती पुढे म्हणाले, “लोकशाही असलेल्या भारताच्या घटनेत एक प्रक्रिया लिखित आहे. त्याप्रमाणेच सगळं चालतं. निवडणूक आयोग स्वतंत्र आयोग आहे. त्यामुळे त्यावर आमच्यासारख्या लोकांनी भाष्य करणं उचित नाही. त्याला एक व्यवस्था आणि प्रक्रिया आहे. त्यानुसार आयोग निर्णय घेत असतो.”

हेही वाचा : शिवसेना पक्ष, धनुष्यबाण शिंदे गटाला, आता पुढची रणनीती काय? उद्धव ठाकरे म्हणाले “आता आम्ही…”

“…तर उद्धव ठाकरेंच्या गटाला सर्वोच्च न्यायालयात जाता येईल”

“उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाला हे मान्य नसेल, तर ते सर्वोच्च न्यायालयात धाव घेतीलच. त्यानंतर काय भूमिका घ्यायची हे सर्वोच्च न्यायालयही ठरवेल. लोकशाहीचं सौंदर्यच हे आहे की, अन्याय वाटत असेल, तर उद्धव ठाकरेंच्या गटाला सर्वोच्च न्यायालयात जाता येईल,” असंही संभाजीराजेंनी नमूद केलं.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhajiraje chhatrapati comment on election commission decision on shivsena eknath shinde uddhav thackeray rno news pbs
Show comments