नाशिक : समृध्दी महामार्गावर अपघातग्रस्त झालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरची प्रवासी क्षमता १७ अधिक एक म्हणजे चालक धरून १८ अशी होती. वाहनात तब्बल ३५ प्रवासी होते. समृध्दी महामार्गावर प्रवेश करताना वाहनांचे टायर, प्रवासी क्षमता आणि तत्सम बाबींची तपासणी होते. असे असताना क्षमतेहून दुप्पट प्रवासी घेऊन निघालेली टेम्पो ट्रॅव्हलर तपासणी नाक्यावरून कशी मार्गस्थ झाली, यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. संबंधित चालक दोन दिवस वाहन चालवत होता. सलग दोन रात्र त्याची झोप झाली नव्हती. अतिश्रमाने थकवा, अस्वस्थतेची परिणती या अपघातात झाल्याचा प्राथमिक अनुमान प्रादेशिक परिवहन विभागाने काढला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृध्दी महामार्गावर अपघातग्रस्त झालेली टेम्पो ट्रॅव्हलर म्हसरुळ येथील रेणुका ट्रॅव्हलची आहे. नाशिकच्या प्रादेशिक परिवहन विभागाकडून तिला योग्यता प्रमाणपत्र देण्यात आले होते. या वाहनास १७ प्रवासी आणि एक चालक अशा १८ जणांच्या वाहतुकीस परवानगी होती, असे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघातावेळी वाहनात क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी होते. शुक्रवारी रात्री सुमारे ३५ जणांना घेऊन नाशिकहून बुलढाण्याकडे हे वाहन मार्गस्थ झाले होते.

हेही वाचा : समृध्दीवर महिन्याला ९५ अपघात; नऊ महिन्यांत ११२ जणांचा मृत्यू

जाताना चालकाने समृध्दी महामार्गाचा वापर केला नाही. रात्रभर प्रवास करून दुसऱ्या दिवशी ते सैलानी बाबा दर्गा येथे पोहोचले. दर्शन झाल्यानंतर वाहनातून दिवसभर आसपासच्या भागात भ्रमंती केली. रात्री ते परतीच्या प्रवासाला निघाले. तेव्हा त्यांनी समृध्दी महामार्गाचा वापर केला. कुठल्या ठिकाणी ते समृध्दी महामार्गावर आले, तिथे वाहनाची तपासणी झाली की नाही, याबद्दल स्थानिक अधिकारी अनभिज्ञ आहेत. समृध्दी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी आरटीओमार्फत वाहनांची तपासणी केली जाते. योग्यता प्रमाणपत्र, वाहनांच्या टायरची स्थिती, क्षमतानिहाय प्रवासी आदी तपासणी होते. या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये परतीच्या प्रवासात ३५ प्रवासी होते. क्षमतेहून दुप्पट प्रवासी घेऊन निघालेल्या वाहनाची तपासणी झाली असती तर हा अपघात टळला असता, याकडे काही जण लक्ष वेधतात.

हेही वाचा : ट्रॅक्टर, दुचाकी चोरी प्रकरणात १८ संशयितांना अटक, १३ वाहने जप्त; यावल पोलिसांची कारवाई

आदल्या दिवशी रात्री चालकाला झोप मिळाली नव्हती. दिवसभर वाहन चालवून रात्री पुन्हा तो तेच काम करीत होता. अतिश्रम, थकव्याने चालकाकडून मालमोटारीला धडक बसली, असे कारण या विभागाकडून दिले जात आहे. या विभागाचे मुंबईतील वरिष्ठ अधिकारी अपघाताच्या चौकशीसाठी घटनास्थळी रवाना झाले. संबंधितांनी चौकशीअंती कुठल्याही मुद्यावर भाष्य करणे उचित ठरेल, असे स्पष्ट केले. दरम्यान, या अपघाताची सखोल चौकशी केली जाईल आणि त्यात जे समोर येईल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samruddhi expressway accident tempo traveller was carrying passengers more than its capacity not checked by respective authorities css
Show comments