जळगाव : धरणगाव तालुक्यातील चांदसर गावाजवळ गस्तीवर असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांवर वाळू माफियांनी हल्ला केला. गुरुवारी ही घटना घडली. हल्लेखोरांनी तलाठी दत्तात्रय पाटील यांना मारहाण करुन गंभीर जखमी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक कंडारे हे घटनास्थळी पोहचले. मात्र, तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तहसील कार्यालयातील अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक प्रतिबंधक पथकात सहभागी नायब तहसीलदार संदीप मोरे, मंडळ अधिकारी लक्ष्मीकांत बाविस्कर, प्रवीण बेंडाळे, तलाठी दत्तात्रय पाटील यांनी गुरूवारी पहाटे गस्तीवर असताना चांदसर गावाजवळील गिरणा नदीत वाळुने भरलेले दोन ट्रॅक्टर पकडले. त्याची माहिती मिळताच दिनेश कोळी, गणेश कोळी, आबा कोळी तसेच ट्रॅक्टर चालक, मालक व वाळू भरणारे मजूर अशा १२ ते १५ लोकांनी महसूलच्या पथकावर हल्ला चढवला. अचानक हल्ला झाल्याने महसूल अधिकाऱ्यांसह पथकातील सदस्यांनी जीव वाचविण्यासाठी नदीपात्रात वाट मिळेल तिकडे पळ काढला. यावेळी तलाठी दत्तात्रय पाटील हे हल्लेखोरांच्या तावडीत सापडले.

हेही वाचा…दसवेलजवळ बस-ट्रॅक्टर अपघातात २५ प्रवासी जखमी

हल्लेखोरांनी तलाठी पाटील यांना फावड्याने आणि लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीत तलाठी पाटील यांच्या पायाचे हाड मोडले असून, त्यांना जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, वाळू माफियांनी महसूलच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची माहिती मिळताच धरणगावचे नायब तहसीलदार सातपुते आणि पाच तलाठी चांदसर गावाजवळील नदीपात्रात पोहोचले. त्यांनाही गावातील काही लोकांनी अडविले. त्यांच्या भ्रमणध्वनीत व्हिडीओ आहे का, हे तपासण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी हल्लेखोरांच्या विरोधात पाळधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sand mafia attacked revenue officials on patrol near chandsar village in dharangaon taluka sud 02