जिल्ह्यतील वाळूमाफियांविरोधात धडक कारवाई करणाऱ्या अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या निषेधार्थ थेट जिल्हाधिकारी कार्यालयालगत वादग्रस्त फलक झळकवण्याची हिंमतमाफियांनी केल्यामुळे महसूल यंत्रणेत खळबळ उडाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, मेहेर चौकात उभारलेल्या या भव्य फलकात अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे आगपाखड करण्यात आली आहे. शिवाय, क्रशर व वाळू ठेकेदारांशी संबंधित काही प्रकरणांचा संदर्भ त्यात असल्याने तो कारवाईने दुखावलेल्या घटकांनी लावल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या वादग्रस्त फलकाची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तसेच महापालिकेला पत्र देऊन या फलकासाठी कोणी परवानगी घेतली, याची विचारणाही केली आहे.
जिल्ह्यातील गोदावरी, गिरणा व इतर नद्यांच्या पात्रातून होणारी चोरटी वाहतूक नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. या संदर्भात वारंवार तक्रारी होत असल्या तरी वाळू माफियांविरुद्ध कारवाई झाल्याची अपवादात्मक उदाहरणे आहेत. या स्थितीत अलीकडेच जिल्हा प्रशासनाने वाळूमाफियांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवत कारवाईचे हत्यार उपसले आहे. वाळूउपशाचा ठेका घेणाऱ्या ठेकेदारांना तिची वाहतूक शासनाने निर्धारित केलेल्या पद्धतीनुसार करावी लागते. त्या संदर्भातील पावतीवर बारकोड असल्याने किती उपसा झाला याची माहिती यंत्रणेला मिळत असते. परंतु, बहुतांश ठेकेदारांकडून विहित प्रमाणाहून अधिक, अथवा संबंधित पावतीचा वापर न करताच वाळूची खुलेआम चोरटी वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले.
याच कारणास्तव महसूल विभागाच्या पथकाने महिनाभरापूर्वी जवळपास ४८ मालमोटारींवर कारवाई केली. काही दिवसांपूर्वी याच स्वरूपाची कारवाई मालेगाव तालुक्यातही करण्यात आली. त्यावेळी १३ मालमोटारींवर कारवाई करण्यात आली. संबंधित मालमोटारींमध्ये सुमारे ८४ ब्रास वाळूची अवैध वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. संबंधितांना २५ ते ३० लाखाचा दंड ठोठावण्याची प्रक्रिया सुरू झाली असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयालगत हा फलक लागल्याने वेगवेगळे तर्क-वितर्क व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयालगत मेहेर चौक आहे. या ठिकाणी मंगळवारी रात्रीच हा वादग्रस्त फलक लावला गेला असावा, असा अंदाज आहे. याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात समजल्यानंतर अपर जिल्हाधिकारी कान्हूराज बगाटे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यास पत्र दिले.
दरम्यानच्या काळात महापालिकेला पत्र देऊन या फलक उभारणीसाठी परवानगी घेतली आहे काय, असल्यास कोणाच्या नावाने परवानगी घेतली, याची विचारणा केली आहे. या घडामोडी सुरू असताना दुपारच्या सुमारास हा वादग्रस्त फलक तातडीने हटवला गेला. या वादग्रस्त फलकामागे वाळूमाफिया आणि क्रशर यांच्यापैकी कोणी तरी असावे, अशी चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आहे.