नाशिक – वनविभाग नाशिक पश्चिमच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात म्हसरूळ शिवारातील रासबिहारी लिंक रोडवरील कित्येक दिवसांपासून बंद असलेल्या बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या वाहनातून तसेच बंगल्यातून सुमारे ३५ लाख रुपयांचा चंदनसाठा जप्त करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक वनपरिक्षेत्राचे अपर मुख्य वनसंरक्षक हृषिकेश रंजन यांच्या बंगल्यातील चंदनाच्या चार झाडांची १२ सप्टेंबर रोजी चोरांनी तोड केली होती. यानंतर रंजन यांनी नाशिक पश्चिमच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चोरांना पकडण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नाशिक पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक भावेश सिद्धेश यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वनाधिकारी विशाल माळी (दक्षता), सहायक वनसंरक्षक प्रशांत खैरनार, वनक्षेत्रपाल हर्षल पारेकर, प्रभारी वनक्षेत्रपाल सविता पाटील यांच्या पथकाने तपास सुरु केला.

हेही वाचा >>> नाशिक : पती-पत्नीची मुलीसह आत्महत्या – इंदिरानगरमधील घटना

तपासादरम्यान वणी दक्षता पथकाला पेठ येथील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयाची सुई म्हसरूळच्या शिवाल्य ट्रेडर्सकडे वळली. म्हसरूळ भागातील संबंधित बंगल्याचा शोध घेतला. अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या या बंगल्याच्या आवारातील जुन्या वाहनात चंदनाची पाच लाकडे आढळून आली. त्यानंतर वनअधिकाऱ्यांनी बंगल्याची झडती घेतली असता, सुमारे साडेतीन हजार किलोंचा अंदाजे ३५ लाख रुपयांचा चंदनसाठा आढळून आला.

हेही वाचा >>> धुळे जिल्ह्यात विसर्जनावेळी नदीत बुडून दोन भावांचा मृत्यू

बंगल्याच्या मालकाचे नाव गोपाल वर्मा असून वनअधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली असता सर्व कागदपत्रे उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला. जप्त करण्यात आलेल्या चंदनाच्या लाकडांच्या साठ्यात काही लाकडांवर वनविभागाकडून करण्यात येणारा क्रमांक आढळला. यामुळे चंदनाची झाडे नेमकी कोठून चोरण्यात आली, याचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. वनअधिकाऱ्यांनी त्यांचा अभिलेख तपासला असता, चंदनाची साठवणूक करण्याविषयीचा स्थलांतर पास आणि साठवणूक परवाना संबंधित व्यापाऱ्याकडे नसल्याचे उघड झाले.

वन अधिनियमांतर्गत गुन्हा

वनविभागाची सर्व कागदपत्रे असल्याचा दावा संबंधित व्यापाऱ्याने केला आहे. त्याला कागदपत्रे सादर करण्यास आठ दिवसांची मुदत देण्यात आली. मात्र साठवणूक परवाना आणि स्थलांतर पास नसल्याने वनअधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sandalwood stock worth rs 35 lakh seized from vehicle parked in bungalow premises in nashik zws