आ. प्रा. देवयानी फरांदे यांची राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार
कर्करोग निदानासाठी आवश्यक ठरणारे सीटी स्कॅन यंत्र दीड महिन्यांपासून बंद. कर्करोगग्रस्तांवरील किरणोपचारासाठीची यंत्रणा वीजपुरवठय़ातील दुरुस्तीमुळे बंद पडलेली. मूत्रपिंड प्रत्यारोपणाला मान्यता आहे, पण त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञ, मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीची पूर्तता न झाल्यामुळे हा विभाग कार्यान्वित झालेला नाही. डायलिसीससाठी यंत्रांची संख्या कमी आणि रुग्णांची संख्या अधिक.. ही सद्य:स्थिती आहे नाशिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाची.
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील अडचणींबाबत आयोजित आढावा बैठकीत उपरोक्त समस्या पुढे आल्या. अतिविशिष्ठ वैद्यकीय सेवा देण्यासाठी साकारलेल्या या रुग्णालयातील उपरोक्त त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणी आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे. काही वर्षांपूर्वी अतिविशिष्ट सेवांसाठी उत्तर महाराष्ट्रासह अहमदनगर जिल्ह्यातील गोरगरीबांना मुंबईला जाणे भाग पडत होते. रुग्णांना स्थानिक पातळीवर आधुनिक उपचार मिळावेत या उद्देशाने साकारलेल्या या रुग्णालयाचे आरोग्य वेगवेगळ्या कारणांमुळे बिघडले आहे. १०० खाटांच्या रुग्णालयात हृद्य विकार, मूत्रपिंड विकार व कर्करोग या आजारांवर उपचार केले जातात. कर्करोगग्रस्त रुग्णांच्या निदानासाठी या ठिकाणी सीटी स्कॅन यंत्रणा आहे. जिल्हा रुग्णालयातील ही यंत्रणा बंद असल्याने तेथील रुग्णांनाही या ठिकाणी यावे लागते. दीड महिन्यांपासून संदर्भ रुग्णालयातील सीटी स्कॅन यंत्रणा बंद असल्याने रुग्णांचे हाल होत असल्याची बाब बैठकीत पुढे आली. या यंत्रणेच्या दुरुस्ती खर्चाचा प्रस्ताव गतवर्षी जूनमध्ये आरोग्य विभागाला पाठविला गेला आहे. परंतु, आजतागायत त्यास मंजुरी मिळालेली नाही. हे यंत्र दुरुस्त झाल्यास रुग्णांची गैरसोय दूर होईल याकडे फरांदे यांनी लक्ष वेधले. किरणोपचार यंत्रणेची वेगळी स्थिती नाही. कर्करोगग्रस्तांवर किरणोपचार केला जातो. डिसेंबर महिन्यापासून या यंत्रणेला वीज पुरवठा करणाऱ्या व्यवस्थेत दोष निर्माण झाला आहे. या दुरुस्तीसाठीच्या खर्चाला रुग्णालयाने पाठपुरावा करूनही मंजुरी दिली गेलेली नाही. यंत्रणा कार्यान्वित झाल्यास रुग्णांना उपचार घेणे सुकर होवू शकेल.
संदर्भ सेवा रुग्णालयास मुत्रपिंड प्रत्यारोपण करण्यासाठी मान्यता मिळालेली आहे. शासनाने मान्यता दिली, पण त्यासाठी आवश्यक नेफ्रोलॉजीस्ट, तंत्रज्ञ, त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्रीची पूर्तता केली गेली नाही. परिणामी, हा विभाग अद्याप कार्यान्वित होऊ शकला नसल्याचे आरोग्य मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. रुग्णालयातील डायलिसीस विभागात आठ यंत्र कार्यान्वित आहेत. चार यंत्र एचआयव्ही व अन्य रुग्णांसाठी राखीव आहेत. डायलिसीससाठी दर दिवशी २० रुग्णांची प्रतिक्षा यादी आहे. या स्थितीत दोन पाळीत ही सेवा दिली जाते. रुग्णालयास अतिरिक्त १० डायलिसीस यंत्र आणि डायलिसीस खुर्चीची निकड आहे. त्यासाठी लागणारी जागा रुग्णालयात उपलब्ध आहे. हे काम तीन पाळ्यांमध्ये करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळही लागणार आहे. आरोग्य विभागाने ही व्यवस्था केल्यास गरजू रुग्णांची गैरसोय दूर होईल आणि प्रतिक्षा यादी कमी होण्यास हातभार लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पद भरतीसाठी मंजुरीची प्रतीक्षा
रुग्णालयातील मुख्य भौतिकशास्त्रवेत्ता, वरिष्ठ जीव वैद्यकीय अभियंता, कॅथलॅब तंत्रज्ञ, डायलेसिस तंत्रज्ञ ही अतिविशिष्ट तांत्रिक संवर्गातील पदांचे सेवा नियम तयार नसल्यामुळे या तंत्रज्ञांना ११ महिन्यांसाठी अस्थाई स्वरुपात काम करावे लागते. संबंधितांना इतरत्र चांगली नोकरी मिळाल्यास ते सेवा सोडतात. यामुळे मध्येच या विभागाच्या कामकाजावर विपरित परिणाम होतो. शासनाने रुग्णालयासाठी ३६७ पदांच्या निर्मितीला आणि भरतीला मंजुरी दिली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता कार्यरत मनुष्यबळ अपुरे आहे. पदनाम व वेतनश्रेणीत बदल करून रुग्णालयाच्या गरजेनुसार पद मंजुरी दिल्यास रुग्णालयातील अडचणी दूर होतील, याकडे आ. फरांदे यांनी लक्ष वेधले आहे.