नाशिक – निफाड तालुक्यातील साकोरे मिग येथील संगीता बोरस्ते यांना वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्यावतीने राज्यस्तरीय वसंतराव नाईक कृषी पुरस्काराने गौरविण्यात आले.
मुंबई येथे कृषीदिनी झालेल्या समारंभात दक्षिण अशिया जैविक तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. सी. डी. मायी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. संगीता बोरस्ते या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या सभासद शेतकरी आहेत. पतीच्या निधनानंतर त्यांनी मागील नऊ वर्षे अत्यंत हिंमतीने घर संसार सांभाळून सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत शेतीत प्रगती केली आहे. अनेक संकटांवर मात करीत त्यांनी द्राक्ष शेतीत केलेली अभ्यासपूर्ण व जिद्दीची वाटचाल प्रेरणादायी आहे. स्वत: ट्रॅक्टरने फवारणी करण्यापासून शेतीतील मेहनतीची अनेक कामे करण्यात त्यांचा हातखंडा आहे.
हेही वाचा – नाशिक : मनमाड-दौंड रेल्वे मार्ग दुहेरीकरणाला वेग
स्वत:च्या आठ एकर क्षेत्रातून त्या उत्तम व्यवस्थापन तंत्राचा अवलंब करीत शेती करीत आहेत. एकूण उत्पादनाच्या ७० टक्क्यांपर्यंत निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेण्यात सातत्य ठेवण्यात त्यांना यश मिळाले आहे. सह्याद्री फार्मर्स स्त्रीशक्तीचा गौरव करणाऱ्या ‘शेतीतल्या नवदुर्गा’ या ध्वनिचित्र मालिकेत तसेच विविध समाज माध्यमांतूनही त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेण्यात आली आहे.