नाशिक: गंगापूर धरणातून एकलहरे औष्णिक वीज केंद्र आणि गोदावरी कालव्यांना आवर्तनासाठी एक हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शहरातून मार्गस्थ होणाऱ्या गोदावरी पात्रात पानवेलींचा कचरा रामकुंड आणि गाडगे महाराज पुलाजवळ वाहून आला. पाणी पातळी वाढल्याने पानवेली काढणाऱ्या ट्रॅ्श स्किमर यंत्राचे काम थांबवावे लागले. नदीपात्रात ठिकठिकाणी अडकलेल्या पानवेली काढण्याचे काम सफाई कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. पातळी कमी झाल्यानंतर यंत्राद्वारे पानवेली हटविणे शक्य होईल, असे महापालिकेचे म्हणणे आहे.
आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर, गोदावरी प्रदूषणाचा विषय चर्चेत आहे. शहरातील सांडपाणी अनेक ठिकाणी थेट नदीपात्रात मिसळते. गोदापात्रात फोफावलेल्या पानवेली त्याचे निदर्शक आहे. त्या काढण्यासाठी महापालिकेकडे ट्रॅश स्किमर यंत्र आहे. विसर्ग होण्याआधी या यंत्रामार्फत अहिल्यादेवी होळकर पुलाखालील भागात काम सुरू होते. परंतु, पाणी पातळी वाढल्याने यंत्राचे काम थांबवावे लागले, असे गोदावरी संवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.
पाटबंधारे विभागाने एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र आणि गोदावरी कालव्यांना आवर्तनासाठी सोमवारी सायंकाळपासून गंगापूर धरणातून एक हजार क्युसेकने पाणी सोडले आहे. गोदावरी नदीपात्रातून हा प्रवाह सुरू असून तो जास्त नसल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. या प्रवाहात पात्रातील पानवेली पुढे वाहू लागल्या. रामकुंड ते गाडगे महाराज पुतळा दरम्यान ठिकठिकाणी लहान-मोठ्या पुलाखाली पानवेली अडकल्या. होळकर पुलाखालील भागात वेगळी स्थिती नव्हती. वाहून आलेल्या पानवेली सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने काढल्या जात असल्याचे गोदावरी संवर्धन कक्षाचे प्रमुख नितीन पवार यांनी सांगितले.
ट्रॅ्श स्किमर यंत्राचे काम थांबले
गोदावरीत प्रवाह वाढल्याने मंगळवारी सकाळी ट्रॅ्श स्किमर यंत्राचे काम थांबवावे लागले. सध्या कर्मचाऱ्यांकडून पात्रात ठिकठिकाणी अडकलेल्या पानवेली काढल्या जात आहेत. प्रवाह कमी झाल्यानंतर यंत्राचा वापर पुन्हा सुरू करता येईल. ट्रॅ्श स्किमर यंत्र एका फेरीत ५०० किलो पानवेली व कचरा काढते. दिवसभरात त्याच्या १५ ते १६ फेऱ्या होऊ शकतात. असे गोदावरी संवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.