शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये आज (२० नोव्हेंबर) जोरदार शाब्दिक चकमक उडाली. कृषी कायदे मागे घेतल्यानं दुःख झालं असेल तर आपण चंद्रकांत पाटलांसाठी शोकसभा घेऊ असं म्हणत संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर हल्ला चढवला. तसेच चंद्रकांत पाटलांची मानसिकता तपासावी लागेल असं म्हटलं. यावर चंद्रकांत पाटलांनी देखील राऊतांनी माझी मानसिकता तपासली तर मी त्यांचं डोकं तपासेल असं प्रत्युत्तर दिलं. या तिखट प्रतिक्रियांनंतर हे शाब्दिक हल्ले वाढतील असं वाटत असतानाच संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील एकाच कार्यक्रमात आणि एकाच सोफ्यावर बसलेले पाहायला मिळाले. यावेळी दोघे एकमेकांशी अगदी दिलखुलासपणे हसत बोलत होते.
संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील भाजपाच्या नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलीच्या लग्नात एकत्र आले. या लग्नाला भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाविकास आघाडीचे देखील दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी संजय राऊत, छगन भुजबळ आणि चंद्रकांत पाटील एकाच सोफ्यावर बसलेले दिसले. ते केवळ शांतपणे बसलेले होते असंच नाही तर चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत यांच्यात हसतखेळत दिलखुलास गप्पाही सुरू असल्याचं दिसलं. छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस देखील एकमेकांना टोले लगावताना दिसले.
संजय राऊत काय म्हणाले होते?
संजय राऊत म्हणाले, मी आता चंद्रकांत पाटलांनी शोकसंदेश पाठवतो. त्यांच्यासाठी कृषी कायदे मागे घेणं ही दुःखद घटना असेल तर आपण त्यांच्यासाठी एखादी शोकसभा घेऊ आणि शोक व्यक्त करू. ज्या देशात आज शेतकरी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहेत तो जर कुणाला शोक वाटत असेल, दुःख वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल.”
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
चंद्रकांत पाटील म्हणाले, “संजय राऊत सार्वजनिक बोलले, मात्र मी समोर असताना बोलले नाहीत. संजय राऊत डॉक्टर आहेत. त्यामुळे मी वेगळा डॉक्टर न शोधता त्यांच्याकडेच जातो म्हणजे आमचा जरा संवाद देखील होईल. नवाब मलिक, संजय राऊत काहीही संदर्भ नसलेल खोट का बोलत आहात, असा संवाद यावेळी करता येईल. यावेळी संजय राऊतांनी माझी मानसिकता तपासली तर मी त्यांचं डोकं तपासेल.”
हेही वाचा : “…तर चंद्रकांत पाटलांसाठी आपण शोकसभा आयोजित करू”, संजय राऊत यांचा हल्लाबोल
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतल्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले होते, “देशातील अशांतता संपवण्यासाठी मी हा निर्णय घेत असल्याचं मोदींनी सांगितलंय. मी मोदींना विनंती करेन की पुन्हा एकदा सर्वांना समजावून सांगून हे शेतकऱ्याच्या हिताचे कायदे देशात पुन्हा आणले पाहिजे.”