राज्यातील ड्रग्ज रॅकेटवरून शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली. “देवेंद्र फडणवीस फार भरकटल्यासारखं बोलत आहेत. त्यांची थोडी मती गुंग झाली,” असा आरोप संजय राऊतांनी केला. ते शुक्रवारी (२० ऑक्टोबर) नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस म्हणतात मोठं नेक्सस उघड होणार आहे. मात्र, नेक्सस उघड झालं आहे. फडणवीसांकडे फार लक्ष देऊ नका. तेही फार भरकटल्यासारखं बोलत आहेत. ते भांग पित नसतील, पण बहुतेक त्यांना त्याच्या वासाने नशा येत असेल. त्यांच्या आसपासची माणसं नशेच्या बाजारात फिरतात. त्या नशेबाजांमुळे फडणवीसांची थोडी मती गुंग झाली आहे.”
“पोलीस उपायुक्तावर भाजपा कार्यकर्त्याकडून हल्ला, तुम्ही काय करताय?”
“कसलं नेक्सस उघड होणार आहे? देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री आहेत. राज्यात एक पिढी बरबाद होताना दिसत आहे आणि फडणवीस राजकारण करत आहेत. फडणवीसांच्या नागपूरमधील सरकारी बंगल्यावर एका पोलीस उपायुक्तावर भाजपा कार्यकर्त्याकडून हल्ला झाला. फडणवीस काय करत आहेत?”, असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला.
हेही वाचा : “सरकारवर सत्तेच्या नशेचा अंमल ‘कुत्ता गोली’प्रमाणे…”; ठाकरे गटाचा हल्लाबोल
“देवेंद्र फडणवीसांसारखा गृहमंत्री महाराष्ट्राला लाभणं दुर्दैव आहे”
“डीसीपीची कॉलर पकडण्यात आली. काय हे गृहमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत. बाळासाहेब देसाईंसारखा गृहमंत्री लाभलेल्या महाराष्ट्राला असा गृहमंत्री लाभणं दुर्दैव आहे. या महाराष्ट्राने अनेक चांगले गृहमंत्री पाहिले आहेत. त्यांनी राजकारणापलिकडे जाऊन राज्याची कायदा सुव्यवस्था सांभाळली. त्यांनी सुडाने कधीही कारवाया केल्या नाहीत,” असंही संजय राऊतांनी नमूद केलं.