ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत आज नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर मंदिरात धार्मिक वाद निर्माण झाला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर राऊतांनी आज त्र्यंबकेश्वर दौरा केला. मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हिंदू खतरेमध्ये नसून नेते खतरेमध्ये असल्याचं म्हटलं आहे.
“त्र्यंबकेश्वराच्या प्रांगणात आपण आहोत. मंदिरात, गावात कमालीची शांतता आहे. या वास्तुला प्राचीन, ऐतिहासिक महत्त्व आहे. मधल्या काळात शांतता भंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा प्रकारे धार्मिक तणाव निर्माण करून जात आणि धर्म वाद निर्माण करून हिंदुत्त्वाला बदनाम करू नये अशी भूमिका आमची आहे. मी तेव्हाही येऊ शकलो असतो, पण शांत झाल्यावर आलो. गावातील प्रमुख लोक भेटले. या गावााची बाजू घेतली, भूमिका मांडली याबाबत त्यांनी माझे धन्यवाद मानले”, असं संजय राऊत म्हणाले.
“गाव ही राजकारण करण्याची जागा नाही. काही लोकांनी असं करण्याचा प्रयत्न केला. पण या गावातील शांतताप्रिय लोकांनी तो डाव उधळून लावला. त्यामुळे हे आदर्श गाव आहे. अशाप्रकारे किती धार्मिक वाद निर्माण केले, पण गावाने सयंम राखला. महाराष्ट्रातील वातवरण, मंदिर, प्रथा परंपरांवरून खराब करू नये. त्र्यंबकेश्वर हे ऐतिहासिक शहर आहे. या शहराच्या विकासाचा प्रयत्न झाला पाहिजे. गोदावरी गायब झाली, गोदावरीचा प्रवाह सुरू करा. विकासाकरता प्राधिकरण तयार करा. अयोध्या प्राधिकरण झालं, त्यानुसार विकास होतोय. त्यामुळे मंदिराच्या विकासाकरता प्राधिकरण करण्याची आमची मागणी आहे”, असंही संजय राऊत म्हणाले.
“या गावात अशाप्रकारचा तणाव निर्माण झाला नव्हता. प्रथा परंपरा चालू असतात. त्या तोडणं म्हणजे हिंदुत्त्व नाही. कोणीतरी उथळ पोरं येतात आणि हिंदुत्त्वावर बोलतात, आव्हानं देतात, हे कसलं हिंदुत्त्व?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, “हिंदू खतरे में है असं म्हटलं जातंय”, असा प्रश्न पत्रकारांनी राऊतांना विचारला. त्यावर राऊत म्हणाले की, “हिंदू अजिबात खरते में नाही. ते स्वतः खतरे में आहेत. ते स्वतः खतरेमध्ये आले त्यांचा पक्ष, नेता खतरेमध्ये येतो. आमचा हिंदू धर्म एवढा कमुकवत नाही. सर्वसमावेशक हिंदू धर्म आहे. हे नव हिंदू निर्माण झाले आहेत. त्यांना हिंदू धर्म कधीच कळणार नाही. त्यांना वीर सावरकर, प्रबोधनकार ठाकरे कळले पाहिजेत मग त्यांना हिंदू धर्म कळेल”, असंही ते म्हणाले.