महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज मुंबईत पंतप्रधान मोदी यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. या रोडशोद्वारे एकप्रकारे शक्तीप्रदर्शन करण्याचा भाजपाकडून करण्यात आला. दरम्यान, या रोड शोनंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान मोदी यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. ठाकरेंची साथ सोडल्यामुळेच पंतप्रधान मोदी रस्त्यावर आले, असे ते म्हणाले. नाशिकमधील प्रचारसभेत बोलताना त्यांनी ही टीका केली.
काय म्हणाले संजय राऊत?
“मुंबईमध्ये पंतप्रधान मोदी यांचा रोडशो झाला. त्यासाठी संपूर्ण मुंबई बंद करण्यात आली होती. रेल्वे आणि मेट्रोदेखील बंद करण्यात आल्या. गेल्या एक महिन्यात मोदींनी महाराष्ट्रात २८ सभा घेतल्या, याशिवाय आज त्यांचा रोड शोदेखील झाला. खरं तर शिवसेना आणि ठाकरेंची साथ सोडल्यामुळेच मोदींना रस्त्यावर यावं लागले आहे. मोदींनी कितीही सभा घेतल्या तरी हा महाराष्ट्र मोदींच्या पाठिशी उभा राहणार नाही”, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.
“महाराष्ट्रात जिथेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली आहे, तिथे भाजपाच्या उमेदवारांचा पराभव होणार आहे. त्या प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल, हे मी खात्रीने सांगू शकतो. कारण मोदींनी कर्नाटकमध्येही २७ सभा घेतल्या होत्या. त्या निवडणुकीत भाजपाच्या १४ मंत्र्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे मोदी आले म्हणून भाजपाला विजय मिळेल”, असं होणार नाही. असेही ते म्हणाले.
हेही वाचा – “खरी शिवसेना अन् राष्ट्रवादी एनडीएबरोबर, तर नकली पक्ष…”; मुंबईतील ‘रोड शो’दरम्यान पंतप्रधान मोदींची टीका!
“आज नाशिकमध्ये पंतप्रधान मोदी यांची सभा झाली. या सभेत एका शेतकऱ्याने त्यांना कांद्याच्या प्रश्नावर बोलण्याची विनंती केली, त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी त्या शेतकऱ्याकडे रागाने बघितले आणि भारत माता की जय अशी घोषणा देत निघून गेले. भारत माता ही काय भाजपाची खासगी संपत्ती आहे का? ज्या शेतकऱ्याकडे त्यांनी रागाने बघितले तोदेखील भारत मातेचे पूत्र होता. जर पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये येऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकत नसतील आणि केवळ थापा मारून निघून जात असतील, तर अशा थापाड्याची या देशाला गरज नाही”, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.