कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गेल्या काही दिवसांमध्ये सीमाप्रश्नावरून मांडलेली भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. एकीकडे बेळगाव, निपाणी, कारवार यासह सीमाभागातील इतर गावांवरील महाराष्ट्राचा दावा कर्नाटक मान्य करायला तयार नाही. दुसरीकडे आता बोम्मई यांनी सांगलीच्या जत तालुक्यातील ४० गावांवर दावा सांगण्याची तयारी सुरू केली आहे. त्यातच आज कर्नाटककडून जतमध्ये धरणाचं अतिरिक्त पाणी सोडण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळण्याची चिन्ह दिसत असताना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे सरकारवर परखड शब्दांत टीका केली आहे.
संजय राऊत आजपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी राज्य सरकार, शिंदे गट आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीसह सीमावादावरही भूमिका स्पष्ट केली. नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“लवकरच शिंदे गटात स्फोट”
संजय राऊतांनी यावेळी शिंदे गटात मोठा राजकीय स्फोट होणार असल्याचा दावा केला आहे. “मी खासदार असलो, तरी त्यापूर्वी एक क्राईम रिपोर्टर आहे. माझा पिंड पत्रकाराचा आहे. त्यामुळे कोणाच्या डोक्यात काय सुरू आहे, ते मला चांगलं कळतं. शिंदे गटात काय सुरू आहे, हे मला माहिती आहे आणि लवकरच त्याचा स्फोट होईल”, असं राऊत यावेळी म्हणाले.
दरम्यान, शिंदे गटाला लक्ष्य करतानाच त्यांनी सीमावादावरून महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला. “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने कर्नाटकने सोडलेल्या अतिरिक्त पाण्यात जलसमाधी घेतली पाहिजे. महाराष्ट्रावर असं आक्रमण गेल्या ५० वर्षांत कधी झालं नव्हतं. बाजूच्या राज्याचा मुख्यमंत्री तुम्हाला सरळ डिवचतोय. या महाराष्ट्राला आव्हान देतोय. त्यामुळे तुमच्यात स्वाभिमान असेल तर जे पाणी सोडलंय त्यात जलसमाधी घ्या”, अशा शब्दांत संजय राऊतांनी शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे.
“स्वाभिमानासाठी शिवसेना सोडली म्हणता, मग आता…”
“स्वाभिमानाच्या मुद्द्यावर तुम्ही शिवसेना सोडली म्हणताय, मग आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला? कर्नाटकचा मुख्यमंत्री रोज या सरकारच्या तोंडावर थुंकतोय. महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री सांगतात आम्ही तीन महिन्यांपूर्वी क्रांती केली.आता करा ना क्रांती. छत्रपती शिवाजी महाराजांचा रोज अपमान सुरू आहे. तुमच्या क्रांतीची वांती झाली का आता?”, अशी टीका संजय राऊतांनी यावेळी केली.
“शिंदे गटात लवकरच स्फोट होईल”, संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले, “आमदार सोडून गेले म्हणून…”
“नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचा आम्हाला आदर आहे. गुजरातच्या एका प्रचारसभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एका भाषणाच्या ओघात विचारलं की नरेंद्र मोदी हे १०० तोंडाचे रावण आहेत का? त्याच्यावर नरेंद्र मोदींनी अश्रू ढाळले आणि म्हणाले पाहा हा माझा अपमान नसून गुजरातचा अपमान आहे. गुजरातच्या सुपुत्राचा अपमान आहे. आणि त्याच्यावर आता निवडणूक लढवली जात आहे. पण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होऊनही भाजपा आणि शिंदे गट गप्प बसलाय. छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान ठरत नाहीये”, असंही राऊत म्हणाले.