नाशिक : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना भ्रष्टाचार झाला. आरोग्यमंत्री शिंदे यांच्या पक्षाचे होते. त्यांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचार उघड झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील मुख्यमंत्र्यांच्या काळात घेतलेले निर्णय स्थगित करत आहेत. फडणवीस भ्रष्टाचार उघड करत असतील तर आम्ही स्वागतच करु, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

नाशिक दौऱ्यावर असलेले राऊत यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांचे कौतुक केले. राज्यात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला प्रतिबंध घालण्याचे काम फडणवीस करत आहेत. शिंदे गटाला पुन्हा मातोश्रीच्या दारात यावे लागेल. शिवसेनेकडे २० आमदारांचे बळ असून याआधी याहून कमी संख्या असतानाही विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे. त्यामुळे आम्ही या पदावर दावा करणार असल्याचे राऊत यांनी नमूद केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रयागराजमधील महापर्वणीत स्नान झाल्यावर लगेचच आम्ही सर्वजण कुंभस्नान करणार होतो. परंतु, सरसंघचालक गेलेच नाहीत, असा चिमटा राऊत यांनी काढला. ॲड. माणिकराव कोकाटे यांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.

नाशिकमध्ये शिवसेनेचे महाशिबीर

महिनाभरात नाशिक येथे उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे महाशिबीर होणार आहे. या महाशिबिरात पक्षाची आगामी निवडणुकांसंदर्भात भूमिका स्पष्ट होईल, अशी माहिती खा. संजय राऊत यांनी दिली.

Story img Loader