नाशिक – शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) वतीने बुधवारी येथे आयोजित निर्धार शिबिराच्या दिवशीच भाजपने जाणीवपूर्वक धार्मिक स्थळावर कारवाईचा मुहूर्त निवडला. गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या अस्तित्वाची, सावलीची भाजपसह सत्ताधाऱ्यांना भीती वाटते. त्यामुळे लक्ष विचलित करण्यासाठी धार्मिक स्थळावर बुलडोझर फिरविण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
महानगरपालिकेने बुधवारी सकाळी काठे गल्लीतील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याची कारवाई केली. तत्पूर्वी रात्री कारवाईस विरोध करणाऱ्या जमावाने दगडफेक केली. यामध्ये २१ पोलीस जखमी झाले. काही वाहनांचे नुकसान झाले. या कारवाईवरून खासदार राऊत यांनी भाजपसह सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरले.
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिबिरासाठी नाशिकमध्ये येत आहेत. राजकीय पक्षाचा महत्वाचा कार्यक्रम होत असताना धार्मिक स्थळावर कारवाईसाठी जाणीवपूर्वक हा दिवस निवडला. शिबिराची तारीख निश्चित झाल्यानंतर नोटीसीची मुदत संपेल. आणि कारवाई करता येईल, असा आजचा मुहूर्त काढला गेला. भाजपचे लोक यात वाकबगार असून त्यांचा हात कोणीही धरू शकणार नाही, असे टिकास्त्र राऊत यांनी सोडले. पंचांग घेऊन ते बसलेले असतात. कुठे दंगल घडवायची, याचा मुहूर्त ते आधीच काढतात.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी भाजपला पोटशूळ आहे. त्यामुळे हिंदुत्वासंबंधी आमच्या पक्षाच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अनधिकृत बांधकामावर कारवाई व्हायला हवी. परंतु, ती नंतरही करता आली असती. ज्यांना देश तोडायचा आहे, त्यांना प्रार्थना स्थळावर कारवाई करून वातावरण खराब करायचे होते, असा आरोप खासदार राऊत यांनी केला. ठाकरे गटाच्या शिबिराला घाबरून सत्ताधाऱ्यांनी असंख्य अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले आहे. सत्ताधाऱ्यांनी बुलडोझर फिरवा वा अन्य काहीही करावे. त्यामुळे शिवसैनिक विचलित होणार नसल्याचा दावा त्यांनी केला.