उद्धव ठाकरेंनी हा नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला होता. आम्ही सत्तेसाठी भूकेलेलो नाही. सत्ता सोडली आम्ही. पण, तुम्ही जे आले आहात, ते बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने यांची चामडी सोलत नागडं केलं आहे. तरीही, हे पेढे वाटून नाचत आहेत, अशा शब्दांत शिवसेना ( ठाकरे गट ) संजय राऊत यांनी शिंदे गटाला फटकारलं आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“सरकार बेकायदेशीर आणि अपात्र ठरलं आहे. सर्वोच्च न्यायालय निर्घृण अपराध्याला फाशीची शिक्षा ठोठावतं. फाशीचा दोर जल्लादाकडे असतो. त्यामुळे शिक्षा ठोठावून न्यायालयाने विधिमंडळातील लोकांकडे पाठवलं आहे. आता त्यांनी फाशी द्यायची आहे. तसेच, ९० दिवसांत विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेचा निर्णय घ्यावा लागेल. अध्यक्षांना अपात्रतेची फाईल दाबता येणार नाही. ९० निर्णय नाही घेतला, तर महाराष्ट्र काय आहे, हे त्यांना कळेल,” असा इशारा संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांना दिला आहे.
हेही वाचा : “ती आमची चूक झाली, नाना पटोलेंनी न विचारता…”, अजित पवारांचा गंभीर आरोप
“सर्वोच्च न्यायालयाने शिंदे आणि त्यांच्या सरकारला दिल्लीत पूर्ण नग्न केलं. नंतर विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलं आहे. हे सरकार बेकायदेशीर असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. त्यांनी नेमलेला व्हीप बेकायदेशीर आहे. व्हीपने दिलेले आदेश बेकायदेशीर आहेत. तिथेच सरकारल हरलं आहे. सुनिल प्रभूच व्हीप असल्याचा कायदेशीर निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिल्यावर हे नागडे का नाचत आहे,” असा हल्लाबोलही संजय राऊतांनी केला आहे.
“राज्यपालांची संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर आहे. बहुमत चाचणीपासून प्रत्येक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवले आहेत. तरीही हे नागडे का नाचत आहेत? एकनाथ शिंदे यांची गटनेते पदी झालेली नियुक्ती बेकायदेशीर आहे. देवेंद्र फडणवीस वकील आहेत. त्यांनी नागपुरातील न्यायालयात वकीली केल्याचं सांगतात. त्यांनी पुन्हा एकदा कायद्याची पुस्तकं चाळली पाहिजेत,” असा सल्ला संजय राऊतांनी दिला आहे.
“काल सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, राजकीय पक्षच विधिमंडळ पक्ष निर्माण करतो. म्हणून फुटलेला गट हा मूळ पक्षावर दावा करू शकत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेचं पक्षाचे अध्यक्ष राहतील. भविष्यात त्याचा निकाल लागेल,” असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.