लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : कुणाल कामरा या तरुण कलाकाराचे व्यासपीठ तोडणे ही औरंगजेबी वृत्ती आहे. कामराने टीका केल्यावर हॅबिटट स्टुडिओ अनधिकृत असल्याचा साक्षात्कार झाला. महापालिकेला अनधिकृत बांधकामे तोडायची असतील तर, त्यांनी बुलडोझर मलबार हिलला फिरवावा, असे आव्हान शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी दिले. वर्षा बंगल्यापासून निरीक्षण करावे. सर्वच मंत्र्यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकामे झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या खासदार राऊत यांनी विविध विषयांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कुणाल कामराने काहीही चुकीचे केले नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. त्याने काँग्रेससह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी यांच्यावरही असे कार्यक्रम केले आहेत. यावेळी कामराने काही चुकीचे केले असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करता आली असती. त्याला कुणाची हरकत नव्हती. परंतु, गुंडगिरी करुन तरुण कलाकारांचे व्यासपीठ तोडण्यात आले. औरंगजेबाने हिंदुंची मंदिरे तोडली होती, तुम्ही लोकशाहीचे मंदिर तोडले, असे टिकास्त्र राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर सोडले.

सत्ताधाऱ्यांकडून छाछूगिरी

नागपूर दंगलीची ठिणगी टाकणारे मंत्रिमंडळात आहेत. तेच कायदा सुव्यवस्थेला आव्हान देत आहेत. कायदा व सुव्यवस्थेला आव्हान म्हणजे गृहमंत्र्यांना आव्हान, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजून घेतले पाहिजे. ज्या प्रकारे राज्य कारभार सुरू आहे, त्याला राज्य करणे म्हणत नाही. विरोधकांवर चिखलफेक करून छाछूगिरी करण्याचे उद्योग केले जात असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. बहुमत फार चंचल असते. कधी सरकेल तेव्हा सत्ताधाऱ्यांना आपण काय चुका केल्या, ते लक्षात येईल. बदल कधीही घडू शकतात. याबद्दल आपण सकारात्मक आहोत. मी बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम करणारा शेवटचा मालुसरे असल्याचेही त्यांनी सांगितले.

२०१४ मध्ये युतीबाबत देवेंद्र फडणवीस सकारात्मक

२०१४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना-भाजप युती व्हावी, यासाठी सकारात्मक होते. परंतु, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या निर्देशानुसार तेव्हा युती तुटली, असा दावा खासदार राऊत यांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात नसल्याचा फायदा घेऊन शिवसेनेला संपपावे, अशी भाजपच्या वरिष्ठांची योजना होती. तसे आदेश आले होते. त्यामुळे एकेका जागेसाठी तेव्हा ७२ तास चर्चेचे गुऱ्हाळ चालविले गेले, असेही त्यांनी सूचित केले.