नाशिक – विठू नामाचा महिमा गात उत्साहपूर्ण वातावरणात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे शनिवारी सकाळी शहरात आगमन झाले. त्र्यंबक रोडवरील पंचायत समिती कार्यालय तसेच जलतरण तलाव येथे पालखीचे नाशिककरांकडून स्वागत करण्यात आले. वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी पालखी जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.

हेही वाचा >>> मुलींसाठी मोफत शिक्षण योजना केवळ नावाला – संस्थांकडून सर्रास शुल्क वसुली

गुरूवारी त्र्यंबकेश्वरहून श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. पालखीचा पहिला मुक्काम गहिनीनाथ समाधी मंदिर परिसरात झाला. शुक्रवारी दुसरा मुक्काम सातपूर परिसरात झाला. शनिवारी सकाळी पालखी पंचायत समिती कार्यालयाजवळ आली असता महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. पंचवटीतील गणेशवाडी परिसरात पालखीचा मुक्काम राहिला. दरम्यान, पालखी मार्गात वेगवेगळ्या सामाजिक संघटना, कार्यकर्त्यांकडून वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. पालखीबरोबर वैद्यकीय पथक आहे, याशिवाय प्रशासनाकडून आवश्यक सुविधा देत निर्मल वारीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरती

संत निवृत्तीनाथ महाराज पालखी पंचवटीतील रामवाडी या मुक्कामाच्या ठिकाणी आली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. नाशिक शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे हे शनिवारी नाशिक येथे आले होते.