त्र्यंबकेश्वर येथे बुधवारपासून श्री निवृत्तीनाथ यात्रेला सुरूवात झाली असून निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आठहून अधिक मानाच्या दिंड्या दाखल झाल्या आहेत. वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. नाशिक महानगर परिवहन सेवेच्या सिटीलिंकने त्र्यंबकेश्वरसाठी बुधवार आणि गुरुवारी जादा बससेवा सुरु केली आहे.
हेही वाचा– नाशिक : कातकरी समाजाच्या पुनर्वसनासाठी कार्यवाही ; उभाडेत हक्काचे घरकुल मिळणार
संत श्रीनिवृत्तीनाथ महाराजांची प्रतिमा डोळ्यात साठवत त्र्यंबकच्या दिशेने वारकऱ्यांचा ओघ सुरू आहे. त्र्यंबक नगरीत येणाऱ्या दिंड्यांचे, वारकऱ्यांचे स्वागत प्रशासनाकडून केले जात आहे. वारकऱ्यांनी त्र्यंबक नगरी गजबजली असून सर्वत्र भक्तिमय सूर ऐकू येत आहेत. यात्रोत्सवानिमित्त हजारो वारकरी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ होत आहेत. पायी दिंडी दाखल होत असल्या तरी बुधवारी मोठ्या संख्येने भाविक त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जाणार असल्याने भाविकांच्या सोयीसाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्यावतीने जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा- नाशिक : त्र्यंबकेश्वरसाठी जादा बससेवा
सद्यस्थितीत सिटीलिंकच्यावतीने तपोवन आगारातून १५ गाड्यांच्या माध्यमातून दिवसभरात १०६ तर, नाशिकरोड आगारातून १० गाड्यांच्या माध्यमातून ६० फेऱ्या त्र्यंबकेश्वरसाठी केल्या जातात. या नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त यात्रोत्सवानिमित्त तपोवन आगारातून सहा जादा बससेवेच्या माध्यमातून ४८ तर नाशिकरोड आगारातून चार जादा बससेवेच्या माध्यमातून ३२ अश्या एकूण १० जादा गाड्यांच्या माध्यमातून ८० अधिक फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. बुधवार आणि गुरूवार असे दोन दिवस ही बससेवा राहणार आहे.