नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पौषवारीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून प्रशासनासह, देवस्थान, पोलीस आदींच्या नियोजनाने वेग घेतला आहे. जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्यांनी निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीकडे अर्थात त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान करण्यास सुरूवात केल्याने शहर परिसरात विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पौषवारी अर्थात निवृत्तीनाथ यात्रा उत्सव २३ ते २७ जानेवारी या कालावधीत त्र्यंबकेश्वर येथे होणार आहे. नवमी ते चतुर्दशी या कालावधीत होणाऱ्या या पौषवारीत जिल्हाभरातून बुधवारपासून विविध भागातील दिंड्या त्र्यंबकेश्वरात दाखल होण्यास सुरुवात होईल.

दिंड्यांच्या माध्यमातून निर्मलवारीचा संदेश सर्वदूर पोहचावा, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. संत निवृत्तीनाथ संस्थानतर्फे दिंड्यांचे स्वागत करण्यात येईल. एकादशीच्या पूर्वसंध्येला निवृत्तीनाथ संस्थांनतर्फे महापूजा करण्यात येईल. २५ रोजी शासकीय महापूजा पहाटे एक ते चार या वेळेत होईल. एकादशीच्या अर्थात पौषवारीच्या दिवशी दुपारी चार वाजता संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या रथाची नगर प्रदक्षिणा होईल.

कुशावर्त तीर्थावर नाथांच्या पादुकांवर अभिषेक झाल्यानंतर ज्योतिर्लिंग तीर्थराज त्र्यंबकराजाचे दर्शन होऊन पालखी संजीवन समाधीकडे मार्गस्थ होईल. २७ रोजी काल्याचे कीर्तन आणि २८ रोजी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पादुकांची प्रक्षालन पूजा झाल्यानंतर पौषवारीचा समारोप होईल. याच कालावधीत निवृत्तीनाथ संस्थानचे परंपरेचे मानकरी मोहन महाराज बेलापूरकर, बाळासाहेब देहूकर, डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर, कान्होबा महाराज देहूकर आदींची कीर्तनसेवा होईल.

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधी मंदिराचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी संस्थानच्या वतीने प्रयत्न होत आहेत. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांच्या मूलभूत सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यात आली असून प्रशासनाचे चांगले सहकार्य लाभत असल्याचे सचिव प्रा. अमर ठोंबरे तसेच अध्यक्ष कांचनताई जगताप यांनी सांगितले. त्र्यंबक नगरपालिका, राज्य परिवहन महामंडळ तसेच पोलिसांच्या वतीने यात्रेच्या अनुषंगाने नियोजन अंतिम टप्पात आहे.

कामाला वेग

संत निवृत्तीनाथ संस्थानतर्फे वारकऱ्यांना अपेक्षित असलेल्या बहुप्रतिक्षित अशा दगडी सभा मंडपाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून लवकरच ते पूर्ण होईल. निवृत्तीनाथांचे संजीवन समाधी मंदिर देखील लवकरच पूर्ण होणार आहे. प्रशासन यासाठी सहकार्य करत आहे अनेक प्रशासनातील अधिकारी या ठिकाणी येऊन भेटी देत असून दैनंदिन कामाचा आढावा घेत आहेत. यंदा संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या अभंग गाथेच्या द्वितीय आवृत्तीचे यानिमित्ताने प्रकाशन होणार आहे. निवृत्तीनाथ संस्थान हे मागील अनेक वर्षांपेक्षा अधिक गतीने काम करत असल्याचे अभिमानाने सांगायला हवे.- प्रा. अमर ठोंबरे (सचिव, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ समाधी संस्थान, त्र्यंबकेश्वर)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sant nivruttinath yatra utsav in trimbakeshwar from tomorrow asj