नाशिक : माउलीचा गजर करत वारकऱ्यांची मांदियाळी त्र्यंबक नगरीत दाखल होत असताना शहर परिसर भगवे ध्वज, टाळ मृदंग यामुळे भक्तीमय झाले आहे. त्र्यंबकेश्वर येथे गुरुवारपासून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सवास  सुरुवात होत आहे. हा यात्रोत्सव निर्मलवारी ठरावा यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत आहेत. यंदा यात्रोत्सवावर दुष्काळाचे सावट असले तरी पाच लाखाहून अधिक वारकरी दर्शनासाठी येतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जानेवारी महिन्यात येणाऱ्या षष्ठीला एकादशीला संत निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांच्या पालख्या त्र्यंबकमध्ये दाखल होत आहेत. या दिंडय़ांचे प्रशासन तसेच वनवासी निर्मलवारीच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. गुरूवारी पहाटे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधीस्थळाची पूजा करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या वतीने विद्युत, पाणी, आरोग्य अशा विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने ३०० जादा गाडय़ांचे नियोजन करण्यात आले असून शनिवापर्यंत या गाडय़ा त्र्यंबक-नाशिक अशा फेऱ्या वारकऱ्यांच्या मागणीनुसार करणार आहेत. त्र्यंबक देवस्थानातही भाविकांना सहज दर्शन घेता यावे, अशी व्यवस्था करण्यात आली असून नगर परिषदेच्या वतीने निर्मलवारी उपक्रम प्रभावीपणे राबविला जावा यासाठी वनवासी आश्रमाच्या मदतीने काम सुरू आहे. यासाठी स्वच्छता, औषधोपचार आणि प्रबोधन या तीन वेगवेगळ्या विषयावर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. त्याकरिता वनवासीसह भोसलाच्या व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मदत घेत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.

बुधवारी सायंकाळपर्यंत तीनशेपेक्षा अधिक दिंडय़ा त्र्यंबक नगरीत दाखल झाल्या. त्यांच्यासाठी शहरातील २० ठिकाणी फिरती स्वच्छतागृहे ठेवण्यात आली असून नगरपरिषदेच्या वतीने त्यांची स्वच्छता वारंवार होत असल्याने महिला वर्गाने या विषयी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला असून गस्त आणि फिरते पथक या माध्यमातून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.