लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील घोडे बाजारात १० दिवसात तीन कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. बाजार अजून सहा ते सात दिवस राहणार असून मागील १२ वर्षांतील उलाढालीचा विक्रम यंदा मोडीत निघण्याची शक्यता आहे. याआधी २०२२ मध्ये सारंगखेडा घोडे बाजारात चार कोटींची उलाढाल झाली होती.
घोडे खरेदी-विक्रीसाठी सारंगखेडा येथील यात्रोत्सवानिमित्त भरणारा बाजार प्रसिध्द आहे. १४ डिसेंबरपासून या घोडे बाजाराला सुरुवात झाली. बाजारात देशातील विविध भागातून २२१० घोडे खरेदी-विक्रीसाठी दाखल झाले. यात ६५७ घोड्यांचे व्यवहार झाले. यातून तीन कोटी दोन लाख ५४ हजार १०० रुपयांची उलाढाल नोंदवली गेली. याआधी मागील १२ वर्षातील सर्वाधिक उलाढाल २०२२ मध्ये झाली होती. त्यावर्षी बाजारात १७३३ घोडे दाखल झाले होते. त्यापैकी ९३४ घोड्यांच्या खरेदी-विक्रीतून चार कोटी सहा लाख ९६ हजार रुपयांची उलाढाल झाली होती. त्यानंतर २०२३ मध्ये २०८० घोडे बाजारात आले होते. त्यापैकी ९१९ घोड्यांच्या खरेदी-विक्रीतून तीन कोटी ९८ लाख ४४ हजार १०० रुपयांची उलाढाल झाली होती.
आणखी वाचा-जळगाव जिल्ह्यात खासगी बस उलटून महिलेचा मृत्यू, चार प्रवासी जखमी
सर्वात कमी उलाढालीची नोंद २०२१ मध्ये झाली होती. करोनानंतर २०२१ मध्ये १५६६ घोडे बाजारात दाखल झाले होते. त्यापैकी ६७५ घोड्यांच्या विक्रीतून दोन कोटी ६२ लाख ८८ हजार ८०० रुपयांची उलाढाल झाली होती. मागील १२ वर्षातील नोंदीनुसार २०१३ मध्ये सर्वाधिक ११९८ घोड्यांची विक्री झाली होती. यंदा सर्वाधिक महाग घोडा पाच लाख ५१ हजार रुपयांना विकला गेला. उत्तर प्रदेशमधील रिछा येथील घोडे व्यापारी अबु रेहमान यांनी हा घोडा गुजरातमधील अमेरी जिल्ह्यातील प्रदिप परमार यांना विकला. मागील १२ वर्षांत २०१२ मध्ये सर्वात महाग किंमतीचा घोडा १५ लाख रुपयांना विक्री झाल्याची नोंद आहे. महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांनी उत्तर प्रदेशच्या धोरातांडा येथील व्यापाऱ्याकडून हा घोडा खरेदी केला होता. मागील १२ वर्षात अवघ्या तीन वेळा १० लाखा पेक्षा अधिक रुपयांना घोडे विक्री झाली आहे.