नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने गावाजवळील चिखलवाडी येथील सर्वहारा परिवर्तन केंद्राच्या वसतिगृहातील अल्पवयीन आदिवासी मुलींना पर्यटकांसमोर जबरदस्तीने नाचण्यास भाग पाडण्यात येत असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर बाल कल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वसतिगृहास भेट दिली. मुली घाबरलेल्या असून पालकही तणावात असल्याचे त्यांना आढळून आले.
सर्वहारा परिवर्तन केंद्रात काही आदिवासी विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला आहे. या ठिकाणी पहिली ते पाचवीचे वर्ग भरतात. या वर्गांना शिक्षण विभागाची मान्यता आहे. या वर्षी पहिल्यांदाच संस्थेने आठवीपर्यंत वर्ग सुरू केले. मे महिन्यात शिक्षण विभागाची मान्यता नसतांना ही प्रवेश प्रक्रिया राबवली गेली. मुलींना सुट्टी असतांनाही केवळ संगणकाचे प्रशिक्षण दिले जाईल, असे सांगून निवासी शाळेत सुट्टीत थांबविण्यात आले. त्यासाठी साडेतीन हजार रुपये शुल्क घेण्यात आले. या संस्थेच्या शाळेमागील टेकडीवर एक हॉटेल आहे. या ठिकाणी काजवे पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. त्या पर्यटकांसमोर सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत विद्यार्थिनींना नाचण्यास सांगितले जाते. न नाचल्यास शिक्षिका संस्थाचालकांच्या सांगण्यावरुन दमदाटी करतात, छड्या देतात, अशी तक्रार मुलींनी पालकांकडे केली. या प्रकाराने संतप्त झालेल्या पालकांनी मुलींना घरी नेण्याची भूमिका घेतली. रविवारी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यावर संस्थाचालक आणि शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित मुलींना आता दुसऱ्या शाळेत दाखल केल्याचे पालकांनी सांगितले.
हेही वाचा… नाशिक: पर्यटकांसमोर नृत्यासाठी आदिवासी मुलींवर बळजोरी; खासगी वसतिगृहाविरुध्द गुन्हा
मंगळवारी बाल कल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली. तक्रारदार मुलींशी चर्चा केली. याविषयी महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर यांनी माहिती दिली. मुलींशी संवाद साधला असता त्या घाबरल्या असल्याचे दिसून आले. पालकही तणावाखाली आढळले. यामुळे त्यांच्याशी जास्त काही बोलु शकले नाही. सद्यस्थितीत मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी पालकांशी चर्चा केली. समाज कल्याण विभागाच्या आदिवासी आश्रमशाळेत या विद्यार्थिनींना प्रवेश घेता येईल का, अशी चर्चा करण्यात आल्याचे पालखेडकर यांनी सांगितले.
हेही वाचा… नाशिक: आरोग्य विद्यापीठाची ३३ केंद्रांवर परीक्षा सुरु
कुठलाही अनुचत प्रकार घडू नये यासाठी वसतिगृहाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी असलेले हॉटेल बंद करण्यात आले आहे. संशयित नाईक आणि महिला शिक्षिका यांची चौकशी सुरू असल्याचे वाडीवऱ्हे पोलिसांनी नमूद केले.