नाशिक : साहित्य क्षेत्रात मानाचा समजला जाणारा यंदाचा ‘जनस्थान पुरस्कार’ ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे. नाशिक शहरातील ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’च्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे वितरण येत्या १० मार्च रोजी होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत डहाके यांनी दिली.

‘जनस्थान’ पुरस्काराचे यंदाचे हे १८ वे वर्ष असून, वर्षाआड तो प्रदान केला जातो. एक लाख रुपये, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यंदा या पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक सतीश आळेकर यांची निवड केली. निवड समितीत ज्येष्ठ नाट्य-चित्र दिग्दर्शक विजय केंकरे, साहित्यिक रेखा इनामदार-साने, गणेश मतकरी, गणेश कनाटे यांचाही समावेश होता. नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल आळेकर यांची निवड समितीने एकमताने निवड केल्याचे डहाके यांनी नमूद केले. ‘याआधीही नाटककारांना ‘जनस्थान’, ‘गोदागौरव’ने सन्मानित केले असले तरी पहिल्यांदाच संपूर्णत: नाटककार असलेल्या सतीश आळेकर यांच्या निवडीवर एकमत झाले. आळेकर यांचे नाट्य क्षेत्रातील काम उल्लेखनीय असून, त्यांच्या प्रत्येक नाटकाने एक मार्ग दाखवला आहे,’ असे कुमार केतकर यांनी सांगितले.

दरम्यान, आयुष्याच्या उतारावर असताना दिग्गज कवीच्या नावे मिळालेला पुरस्कार निश्चितच आनंददायी असल्याची प्रतिक्रिया आळेकर यांनी दिली. शाळेमध्ये स्काऊटच्या पेहरावामध्ये ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ ही कविता खड्या आवाजात म्हणताना स्फुरण चढत असे. या कवितेने कुसुमाग्रजांशी पहिला परिचय झाला. ऋजू व्यक्तिमत्त्वाच्या कुसुमाग्रजांना भेटण्याचा योग आला तेव्हा त्यांच्या तेजाने मी भारावून गेलो होतो. नाशिकला सायखेडकर नाट्यगृहामध्ये ‘थिएटर अॅकॅडमी’चे ‘घाशीराम कोतवाल’ नाटक पाहण्यासाठी कुसुमाग्रज आले होते. नाटक पाहिल्यानंतर त्यांनी आवर्जून पोस्ट कार्ड पाठवून आपला अभिप्राय नोंदविला होता. माझी ‘महानिर्वाण’ आणि ‘बेगम बर्वे’ ही नाटके पाहिली होती. एकदा दबकतच मी त्यांना घरी भेटण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी माणसांच्या गराड्यात असलेल्या कुसुमाग्रज माझ्याशी छान गप्पा मारल्या, अशा अनेक आठवणींना आळेकर यांनी उजाळा दिला.

प्रभावशाली, प्रगतीशील नाटककार

● राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक, पुणे विद्यापीठातील सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सचे आळेकर प्रमुख राहिले आहेत. परदेशातील विद्यापीठांमध्ये त्यांनी काम पाहिले आहे.

●मिकी आणि मेमसाहेब, महानिर्वाण, महापूर, दुसरा सामना, अतिरेकी, बेगम बर्वे ही त्यांची नाटके गाजली. ‘पद्माश्री’सह संगीत नाटक अकादमी पुरस्काराने ते सन्मानित आहेत.

● आळेकर हे आधुनिक मराठी रंगभूमीवरील प्रभावशाली आणि प्रगतीशील नाटककार मानले जातात.

ज्यांच्या कविता वाचत आणि म्हणत मी लहानाचा मोठा झालो, अशा श्रेष्ठ कवीच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराने मनस्वी आनंद झाला आहे. ‘महानिर्वाण’ नाटकाला पन्नास वर्षे पूर्ण होत असताना आणि नवीन नाटकाचे प्रयोग रंगमंचावर सुरू असताना मिळालेल्या पुरस्काराचा अधिक आनंद आहे. सतीश आळेकर

Story img Loader