नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून बंडखोरी करणारे काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी त्यांच्या अपक्ष उमेदवारीवरून झालेल्या राजकारणावर मोठं वक्तव्य केलं. “आमच्या संपूर्ण परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं,” असा आरोप सत्यजीत तांबे यांनी केला. तसेच किती राजकारण असतं हे सर्वांनी मागील चार-पाच दिवसात टीव्हीवर पाहिलंच आहे, असं सूचक विधान करत आम्ही त्यावर योग्यवेळी योग्यरितीने बोलूच, असा इशारा दिला. ते बुधवारी (१८ जानेवारी) नाशिकमध्ये एका सभेत बोलत होते.
सत्यजीत तांबे म्हणाले, “मी आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे सर्व शिक्षक, पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. ज्यावेळी आमच्या संपूर्ण परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं, तेव्हा कपिल पाटलांनी आम्हाला स्वतः फोन करून पाठिंबा दिला. अशा काळात कपिल पाटील आणि शिक्षक भारती आमच्या मदतीला धावून आली. हे मी कदापि विसरू शकणार नाही.”
हेही वाचा : तांबे यांना ‘सत्तेच्या पाण्याची तहान’
“गेले २२ वर्षे मी संघटनेच्या माध्यमातून राज्यात आणि देशात काम केलं”
“मला खात्री आहे की, मी सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करेन. गेले २२ वर्षे मी संघटनेच्या माध्यमातून राज्यात आणि देशात काम करत आहे. मी २००० मध्ये एनएसयूआय या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून कामाला सुरुवात केली. पुढे मी १० वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं. त्यानंतर मी युवक काँग्रेसमध्ये काम केलं. युवक काँग्रेसचा राज्याध्यक्ष म्हणून चार वर्षे काम केलं,” असं मत सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून जिल्हा काँग्रेसमध्येच दुफळी
“मला पाठिंबा देण्याचा विचार कपिल पाटलांच्या मनात अनेक वर्षांपासून”
सत्यजीत तांबे पुढे म्हणाले, “देशातील असं एकही राज्य नाही जिथं मी काँग्रेस पक्षाचं संघटनात्मक काम केलं नाही. राज्यातील एकही तालुका आणि गाव नाही, जिथं मी काँग्रेसचं संघटनात्मक काम केलं नाही. युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना चांद्यापासून बांद्यापर्यंत मी मित्र जमवण्याचं काम केलं. अनेक सामाजिक, राजकीय संस्था, संघटनांवरही मी काम करतो आहे. म्हणूनच कपिल पाटील यांच्या मनात मला पाठिंब्याचं गेल्या अनेक वर्षांपासून होतं.”
हेही वाचा : Photos : तुम्ही भाजपा पुरस्कृत उमेदवार होणार का? सत्यजीत तांबे म्हणाले, “एका उदात्त हेतूने…”
“खूप राजकारण झालं, त्यावर योग्यवेळी बोलूच”
“खरंतर कपिल पाटील माझ्यासाठी विधानसभा मतदारसंघ शोधत होते. आमची अनेकवेळा चर्चा व्हायची. ते म्हणायचे तू या मतदारसंघातून उभं राहण्याचा प्रयत्न कर, तू तिथून उभं राहण्याचा प्रयत्न कर. परंतू राजकारण असतं. ते किती असतं हे सर्वांनी मागील चार-पाच दिवसात टीव्हीवर पाहिलंच आहे. खूप राजकारण झालं आहे. आम्ही त्यावर योग्यवेळी योग्यरितीने बोलूच. सध्या मी राजकारणावर बोलणार नाही,” असंही सत्यजीत तांबेंनी नमूद केलं.