काँग्रेस आमदार डॉ. सुधीर तांबे आणि त्यांचा मुलगा, काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून बंडखोरी केली. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बंडखोरांच्या पाठिशी उभं राहणार नाही, असं सूचक वक्तव्य केलं. इतकंच नाही तर पक्षश्रेष्ठींना तक्रार करून सुधीर तांबेंचं निलंबनही केलं. यावर आता सत्यजीत तांबेंना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी एका वाक्यात सूचक वक्तव्य केलं. ते बुधवारी (१८ जानेवारी) नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“बंडखोरांच्या पाठिशी उभं राहणार नाही” या नाना पटोलेंच्या वक्तव्यावर सत्यजीत तांबे म्हणाले, “मी यापूर्वीच सांगितलं आहे की, या प्रकरणावर योग्यवेळ आल्यावर आम्ही बोलू.”

“आमदार कपिल पाटील यांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिला”

शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्याबाबत विचारलं असता सत्यजीत तांबे म्हणाले, “शिक्षक भारतीचे नेते आमदार कपिल पाटील यांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यांचे मी आभार मानतो. माझी अपक्ष उमेदवारी असल्यामुळे अनेक संघटना समोर येत आहेत आणि मला पाठिंबा देत आहेत. मी त्यांचं स्वागत करत आहे.”

हेही वाचा : काँग्रेससमोर मोठा पेच, काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेचं गटनेतेपद बंडखोर सुधीर तांबेंकडे, पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…

“आमच्या संपूर्ण परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं”

दरम्यान, नाशिकमधील सभेत बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले, “मी आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे सर्व शिक्षक, पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. ज्यावेळी आमच्या संपूर्ण परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं, तेव्हा कपिल पाटलांनी आम्हाला स्वतः फोन करून पाठिंबा दिला. अशा काळात कपिल पाटील आणि शिक्षक भारती आमच्या मदतीला धावून आली. हे मी कदापि विसरू शकणार नाही.”

हेही वाचा : “२२ वर्षं मी काँग्रेसमध्ये काम केलंय, मला फक्त…”, सत्यजीत तांबेंची काँग्रेसमधून निलंबनावर सूचक प्रतिक्रिया!

“गेले २२ वर्षे मी संघटनेच्या माध्यमातून राज्यात आणि देशात काम केलं”

“मला खात्री आहे की, मी सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करेन. गेले २२ वर्षे मी संघटनेच्या माध्यमातून राज्यात आणि देशात काम करत आहे. मी २००० मध्ये एनएसयूआय या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून कामाला सुरुवात केली. पुढे मी १० वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं. त्यानंतर मी युवक काँग्रेसमध्ये काम केलं. युवक काँग्रेसचा राज्याध्यक्ष म्हणून चार वर्षे काम केलं,” असं मत सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : ‘…आता मलाही आपण एक संधी द्यावी’; सत्यजित तांबे यांचे नागरिकांना आवाहन

“मला पाठिंबा देण्याचा विचार कपिल पाटलांच्या मनात अनेक वर्षांपासून”

सत्यजीत तांबे पुढे म्हणाले, “देशातील असं एकही राज्य नाही जिथं मी काँग्रेस पक्षाचं संघटनात्मक काम केलं नाही. राज्यातील एकही तालुका आणि गाव नाही, जिथं मी काँग्रेसचं संघटनात्मक काम केलं नाही. युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना चांद्यापासून बांद्यापर्यंत मी मित्र जमवण्याचं काम केलं. अनेक सामाजिक, राजकीय संस्था, संघटनांवरही मी काम करतो आहे. म्हणूनच कपिल पाटील यांच्या मनात मला पाठिंब्याचं गेल्या अनेक वर्षांपासून होतं.”

हेही वाचा : Photos : तुम्ही भाजपा पुरस्कृत उमेदवार होणार का? सत्यजीत तांबे म्हणाले, “एका उदात्त हेतूने…”

“खूप राजकारण झालं, त्यावर योग्यवेळी बोलूच”

“खरंतर कपिल पाटील माझ्यासाठी विधानसभा मतदारसंघ शोधत होते. आमची अनेकवेळा चर्चा व्हायची. ते म्हणायचे तू या मतदारसंघातून उभं राहण्याचा प्रयत्न कर, तू तिथून उभं राहण्याचा प्रयत्न कर. परंतू राजकारण असतं. ते किती असतं हे सर्वांनी मागील चार-पाच दिवसात टीव्हीवर पाहिलंच आहे. खूप राजकारण झालं आहे. आम्ही त्यावर योग्यवेळी योग्यरितीने बोलूच. सध्या मी राजकारणावर बोलणार नाही,” असंही सत्यजीत तांबेंनी नमूद केलं.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satyajeet tambe comment on congress state president nana patole nashik election pbs
Show comments