गेल्या काही दिवसांपासून नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. या बहुचर्चित निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी विजय मिळवला आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेसने तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केलं होतं. पक्षाकडून हकालपट्टी झाल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर जिंकली.
निवडणूक जिंकल्यानंतर तांबे भाजपला पाठिंबा देणार की, स्वगृही म्हणजेच काँग्रेसमध्ये जाणार याबद्दल चर्चा सुरू आहेत. परंतु स्वतः तांबे यांनी या चर्चांना शनिवारी (०४ फेब्रुवारी) पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांनी तांबे यांना विचारलं की, आमदार म्हणून निवडून आल्यानंतर काँग्रेसला पाठिंबा देणार की भाजपाला? त्यावर तांबे म्हणाले की, “मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढलो आणि यापुढेही मी अपक्षच राहणार.”
दरम्यान, तांबे परत कांग्रेसमध्ये जाणार नाहीत, असा विश्वास भारतीय जनता पार्टीला देखील वाटतो. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज एका पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं की, “सत्यजीत तांबे हे अपक्ष होते म्हणून आम्ही त्यांना मदत केली. भारतीय जनता पार्टीच्या पाच जिल्ह्यांमधील स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी तांबे यांना समर्थन दिलं. तांबे यांना आमच्या पक्षाने केवळ मदत केली.”
हे ही वाचा >> पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी दीपक केसरकरांचे शरद पवारांना आवाहन, म्हणाले “पवारसाहेब सर्वांचेच…”
बावनकुळे म्हणाले की, तांबे हे अपक्ष निवडून आले आहेत.
नाशिक पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीने उमेदवार दिला होता. तांबे आघाडीच्या उमेदवाराविरोधात लढून निवडून आले आहेत. त्यामुळे तांबे आता महाविकास आघाडीत परत जाणार नाहीत. आम्ही ती निवडणूक लढणार नाही असं आधीच सांगितलं होतं. त्यामुळे तांबे अपक्ष असल्यामुळे आमच्या नेत्यांनी त्यांना समर्थन दिलं.