लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : मुळेगाव ते अंजनेरी माथा प्रस्तावित रस्त्यामुळे या भागातील नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या गिधाडांच्या नैसर्गिक अधिवासाला धोका निर्माण होऊ शकतो. याकडे लक्ष वेधण्यासाठी अंजनेरी वाचवा कृती समितीच्या वतीने गुरुवारी नाशिक विभाग उपवनसंरक्षक कार्यालयासमोर सिटी बजाओ आणि शासन-प्रशासन जगाओ हे आंदोलन करण्यात आले. या वेळी समितीच्या शिष्टमंडळाने वनअधिकाऱ्यांना निवेदन दिले.
अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. अंजनेरी संवर्धन राखीव वनक्षेत्रात १४ किलोमीटर रस्ता बांधकामाचा प्रस्ताव आहे. याबाबत वनविभागाचे सर्वेक्षण सुरू आहे. प्रशासनाच्या या हालचालींना विरोध करण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी समाजमाध्यमातूनही अंजनेरी वाचवा अशी हाक दिली.
नाशिकच्या पर्यावरणप्रेमींनी अंजनेरीत जाऊन तेथील ग्रामस्थांसह या विषयावर बैठकही घेतली. अंजनेरीच्या ग्रामस्थांची कोणतीही मागणी नसताना कोणाच्या भल्यासाठी हा रस्ता तयार करण्यात येत आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्र्यंबके श्वरच्या पर्वतरांगांमध्ये होणारे उत्खनन बंद करावे, त्र्यंबके श्वर परिसरातील जंगल कें द्रीय राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करावे, रस्ता बांधण्यासाठी लागणाऱ्या निधीतून अंजनेरीत विकासकामे करावीत, असे ठरावही त्या बैठकीत करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्य़ाबाहेरूनही पर्यावरणप्रेमींनी या प्रस्तावित रस्त्याला विरोध करणे सुरू केले.
रस्ता तयार झाल्यास या क्षेत्रातील तीन हजारांपेक्षा जास्त विविध प्रजातींची झाडे, लांब चोचीची गिधाडांची साडेतीनशेहून अधिक घरटी, विविध पक्ष्यांची घरटी, कं दील पुष्पसारखी दुर्मीळ वनस्पती नष्ट होणार आहे. यामुळे निसर्गाची हानी होणार आहे. रस्ता पक्का झाला तर परिसरात मानवी वर्दळ वाढेल. बिबटे, तरस, कोल्हे, खोकड, अंजनेरीचे प्रसिद्ध लालमुखाचे माकड सैरभैर होईल, अशी शक्यता समितीने व्यक्त केली आहे.
शिष्टमंडळाने उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांची भेट घेतली. समितीने अंजनेरीच्या जैवविविधतेच्या मुद्दय़ासह तेथील जैवसंपदाची माहिती दिली. गिधाड आणि अन्य जैवसंपदेची माहिती घेत वरिष्ठ पातळीवर याचा अहवाल सादर करण्याचे आश्वासन गर्ग यांनी दिले. या वेळी शेखर गायकवाड, जुई पेठे, रमेश अय्यर, पक्षी संघटनेचे अध्यक्ष जाधव, निशिकांत पगारे आदी उपस्थित होते.