नाशिक : राज्यातील सर्व शाळांतील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी (दोन) परीक्षेचे वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार आठ ते २५ एप्रिल या कालावधीत ही चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य मंडळाच्या सर्वच शाळांतील परीक्षा एकाच वेळी घेण्यात येणार असल्याने या वेळापत्रकावर नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ तसेच जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी आक्षेप घेतला आहे. त्याबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी प्रकाश अहिरे यांना देण्यात आले आहे.

इतक्या उशिरा संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा झाल्यास एक मे रोजी निकाल जाहीर करण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतील. एससीइआरटीने दिलेल्या सूचनांनुसार शासकीय,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षेसाठी प्रथम भाषा, गणित, आणि तृतीय भाषा आदी विषयांच्या प्रश्नपत्रिका शासनाच्या वतीने पुरविण्यात येणार असून इतर व्यवस्थापनाच्या शाळांनी सर्व प्रश्नपत्रिका शाळास्तरावर तयार करावयाच्या आहेत.

नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी सदर परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करून शाळांना निकाल तयार करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध करून देण्यात यावा. अशी मागणी केली आहे. जिल्ह्यातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रमुख मागण्या मांडल्या. सदर परीक्षेच्या वेळापत्रकाबाबतचे निवेदन माध्यमिक शिक्षण विभागाने त्वरीत शासनास पाठवून ग्रामीण भागातील पाणी टंचाई, वाड्या-वस्त्यांवरून शाळेत येणारी मुले, या बाबीचा विचार करून वेळापत्रकात बदल करावा अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. निवेदन देतेवेळी मुख्याध्यापक संघाचे सचिव देशमुख, उपाध्यक्ष प्रदिप सांगळे, विस्तार अधिकारी पी. यु. पिंगळकर, रवींद्र मोरे यांच्यासह मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Story img Loader