समग्र शिक्षा अंतर्गत जिल्ह्यातील शाळासिद्धी बाह्यमूल्यमापन करण्याची प्रक्रिया २७ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार असून त्यासाठी जिल्ह्यातील १० टक्के शाळांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ३३० शाळांचे बाह्यमूल्यमापन करण्यासाठी शाळा सिद्धी निर्धारकांची ६० पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- मुक्त विद्यापीठ ओळख निर्माण करण्यात यशस्वी; दीक्षांत सोहळ्यात डाॅ. इंद्र मणी यांचे प्रतिपादन

या कार्यक्रमांतर्गत शाळांना प्रथम स्वयं मूल्यमापन करायला सांगितले जाते आणि त्यानंतर शासनातर्फे बाह्यमूल्यमापन करण्यात येते. २०२०-२१ या वर्षात स्वयंमूल्यमापन पूर्ण केलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील प्राथमिक स्तरावरील १० हजार आणि माध्यमिक स्तरांतील १८५१ शाळांचे बाह्यमूल्यमापन करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील २७८ प्राथमिक शाळा आणि ५२ माध्यमिक शाळा अशा एकूण ३३० शाळांचे शाळासिद्धी बाह्यमूल्यमापन केले जाणार आहे. त्यासाठी शाळासिद्धीचे प्रशिक्षण घेतलेले ६० निर्धारक आणि तालुकानिहाय गटसाधन केंद्रातील विषयतज्ज्ञ यांच्या एकत्रिकरणातून दोन व्यक्ती असलेली ६० पथके तयार करण्यात आली आहेत. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, शाळासिद्धीचे जिल्हा नियंत्रण अधिकारी तथा डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे, माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, शाळासिद्धीचे जिल्हा समन्वयक डॉ. जगदीश पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळासिद्धी बाह्यमूल्यमापनाचे नियोजन केले जात आहे.

हेही वाचा- “संजय राऊत हे दात काढलेले वाघ”; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून खिल्ली

२०२०-२१ या वर्षात स्वयंमूल्यमापन केलेल्या शाळांपैकी प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक केंद्रातील शाळा निवडण्यात आली आहे. बाह्यमूल्यमापन कसे करावे यासंदर्भात २४ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर २७ फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीत संबंधित शाळांना भेटी देऊन त्यांचे शाळासिद्धी बाह्यमूल्यमापन करण्यात येणार असून ऑनलाईन माहिती अपलोड केली जाणार आहे. बाह्यमूल्यमापनासाठी निवड झालेल्या शाळांनी शाळासिद्धी निर्धारकांना सहकार्य करावे असे आवाहन शाळासिद्धीचे जिल्हा नियंत्रण अधिकारी डॉ. चंद्रकांत साळुंखे यांनी केले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School achievement external evaluation of 330 schools in jalgaon district from monday dpj
Show comments