भगतवाडीतही धामडकीवाडी प्रारूपद्वारे शिक्षण

नाशिक :  जिल्ह्यात भूतांची शाळा म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या अतिदुर्गम भागातील भगतवाडी जिल्हा परिषद शाळेत टीव्हीवरच्या शाळेच्या धामडकीवाडी प्रारूपानुसार  शिक्षण देण्यास सुरूवात करण्यात आली.

इगतपुरी तालुक्यातील अनेक अतिदुर्गम आदिवासी गावांमध्ये करोना संसर्गामुळे शाळांमधला किलबिलाट बंद झाला आहे. संवेदनशील मनाच्या शिक्षकांना यामुळे दु:ख होत आहे. यातून मार्ग काढत धामडकीवाडी येथील शिक्षक प्रमोद परदेशी यांनी टाकावू साहित्यापासून टीव्हीवरची शाळा हा लक्ष्यवेधी उपक्रम सुरु केला. राज्यभर या उपक्रमाची शिक्षणतज्ज्ञांसह अनेक शाळांनी प्रेरक दखल घेतली. त्यानुसार इगतपुरी तालुक्यातील भगतवाडी जिल्हा परिषद शाळेनेही हा उपक्रम प्राधान्याने राबविण्याचे ठरविले. पेहेचान प्रगती फाउंडेशनच्या प्रगती अजमेरा यांच्या आर्थिक सहाय्याने भगतवाडी येथे ४८ आदिवासी विद्यार्थ्यांंना एका दूरचित्रवाणी संचासमोर सहा विद्यार्थी याप्रमाणे आठ संचासमोर प्राथमिक शिक्षणाचे धडे देणे सुरु करण्यात आले. भूतांची शाळा म्हणून परिचित असलेल्या शाळेत टीव्हीवरची शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांंनी आनंदोत्सव साजरा केला.

इगतपुरी तालुक्यात अनेक शाळा डोंगराळ अतिदुर्गम भागामध्ये आहेत.

या गावांमध्ये जाण्यासाठी धड रस्ते नाहीत. त्यात भर म्हणजे भ्रमणध्वनीचे जाळे अजिबात नाही. यासह करोनाच्या उद्रेकामुळे सर्वत्र शाळांमधील किलबिलाट थंडावलेला आहे. शैक्षणिक वर्ष सुरु झाल्याने विद्यार्थ्यांंनाही शाळेची ओढ लागली आहे. शासकीय धोरणानुसार भ्रमणध्वनीद्वारे ऑनलाईन शिक्षणाचा डंका पिटला गेला.

तथापि जिथे भ्रमणध्वनीला संपर्क नाही. अँड्रॉइड भ्रमणध्वनी काय असतो, हेच माहीत नाही. तिथे विद्यार्थ्यांंना शिक्षण कसे देणार, अशा ठिकाणी टीव्हीवरच्या शाळेचे धामडकीवाडी प्रारूप कामी येत आहे. भगतवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका वृषाली आहेर, सौरभ अहिरराव यांनी बहुचर्चित शैक्षणिक प्रयोगाची धामडकीवाडी येथे जावून सखोल माहिती घेतली. त्यांनतर त्यांनी पेहचान प्रगती फाउंडेशनच्या प्रगती अजमेरा यांच्याशी संपर्क साधला. अजमेरा यांनी भगतवाडी शाळेला आर्थिक सहाय्य केले.

केबलतज्ज्ञ अमजद पटेल यांनी टाकावू साहित्यापासून टीव्हीवरच्या शाळेच्या कामास सुरुवात केली. वाडीतील आठ घरांतील प्रत्येक टीव्हीपुढे सहा विद्यार्थ्यांंसाठी शाळेतून प्रसारण केबल जोडण्यात आली. प्रगती अजमेरा यांच्या हस्ते भगतवाडीत टीव्हीवरच्या शाळेव्दारे शिक्षण देण्यास सुरूवात करण्यात आली.  आठ घरांमध्ये ४८ विद्यार्थ्यांंना सकाळपासून सायंकाळपर्यंत आणि रात्रीच्या वेळीही आपल्या अभ्यासक्रमावर आधारित प्रसारणातून शाळा अनुभवता येईल. स्वयंसेवक भोरू भगत, रामचंद्र भगत यांच्या सहाय्याने टीव्हीवरची भगतवाडी शाळा आकाराला आली आहे. या संपूर्ण यशस्वी प्रयोगाचे खरे श्रेय प्रयोगाचे निर्माते प्रमोद परदेशी यांचे असल्याने इगतपुरी तालुक्याची मान उंचावली असल्याचे गट शिक्षणाधिकारी अशोक मुंढे यांनी सांगितले.

भगतवाडी शाळेची इमारत पूर्वीच्या स्मशानभूमीवर बांधण्यात आली असल्याने गावातील नागरिक पूर्वी विद्यार्थ्यांंना भीतीमुळे शाळेत पाठवत नव्हते. अनेक समज-गैरसमज पसरले होते. काही महिन्यांच्या दीर्घ प्रयत्नांनी प्रमोद परदेशी यांनी नागरिकांचे मत परिवर्तन केले. त्यामुळे या शाळेला भूतांची शाळा म्हणून ओळख आहे. या शाळेतून टीव्हीवरच्या शाळेद्वारे घराघरात ज्ञानगंगा गेल्याने आदिवासी नागरिकांनी जल्लोष केला.

भगतवाडी येथे ऑनलाईन शिक्षणाला नानाविध समस्या असल्याने आम्ही शिक्षक चिंताग्रस्त होतो. आतापर्यंत विद्यार्थ्यांंना दिलेले शिक्षण व्यर्थ जाण्याचा मोठा धोका होता. प्रमोद परदेशी यांनी निर्मित केलेला प्रयोग भावल्याने आम्ही प्रगती अजमेरा यांच्या मदतीने आमच्या शाळेत टीव्हीवरची शाळा सुरु  के ली.

– वृषाली आहेर  (मुख्याध्यापिका, भगतवाडी)

Story img Loader