मनमाड – ‘भारत माता की जय’ चा नारा, ढोल-ताशांचा गजर अशा थाटात जालना – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे शनिवारी दुपारी पावणेतीनला मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात जल्लोषात स्वागत करण्यात आले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नागपूर येथून ऑनलाईन प्रणालीद्वारे तर मनमाड स्थानकातून भुसावळ मंडळ रेल्वे प्रंबधक इती पांडेय, आमदार नरेंद्र दराडे यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी भाजपा, शिवसेना, पदाधिकारी-कार्यकर्ते, रेल्वेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. रेल्वेच्या स्वागतासाठी शालेय विद्यार्थ्यांना स्थानकावर आणण्यात आले होते. त्यांना या रेल्वेतून प्रवास घडला नाही. पण स्वागत गीत म्हणावे लागले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी अयोध्या रेल्वे स्थानकातून या गाडीचा शुभारंभ केला. जालना – मुंबई वंदे भारत ही रेल्वे गाडी आठवड्यातून सहा दिवस (बुधवार) सोडून धावणार आहे. या गाडीला नाशिक जिल्ह्यातील मनमाड आणि नाशिक रोड हे अधिकृत थांबे आहेत. त्यामुळे उत्तर भारतातून मुंबईला जाणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी ही गाडी उपयुक्त ठरणार आहे. आरामदायी आणि सुपरफास्ट प्रवास या गाडीचे वैशिष्ट्ये आहे. मनमाड स्थानकात फलाट क्रमांक चारवर २.४५ मिनिटांनी जालना-मुंबई वंदे भारतचे आगमन झाले. ढोल ताशांच्या गजरात भारत माता की जयच्या घोषणा आणि टाळ्यांच्या कडकडात या गाडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी अप्पर रेल्वे प्रबंधक कौशल्यकुमार, कार्मिक प्रबंधक एन. एस. काजी, मंडळ विद्युत अभियंता पालटासिंग आदी उपस्थित होते.
हेही वाचा – Video: नाशिकमधील ‘या’ आर्ट स्टुडिओचा साजरा होतोय शतकोत्सव!
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या नागपूर येथून ऑनलाईन सहभागी झाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्रात वंदे भारत ट्रेन सुरू होत आहे. मनमाड व नाशिककरांना याचा फायदा होणार आहे. तसेच इतर काही रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, अशी प्रामुख्याने मागणी होत आहे. त्यासाठीदेखील रेल्वेमंत्र्यांकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून त्या गाड्या सुरू होतील, यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती पवार यांनी दिली. प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळ रेल्वे प्रबंधक इती पांडेय यांनी केले.
महाराष्ट्राच्या कन्येचा गौरव
‘वंदे भारत’ मनमाड स्थानकात येताच सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते या गाडीची लोकोपायलट महाराष्ट्राची कन्या कल्पना धनवटे यांनी. ‘वंदे भारत’या गाडीचे सारथ्य करण्याची जबाबदारी पहिल्याच दिवशी कल्पनावर आली. तीने कौशल्याने गाडी चालवली. उपस्थितांनी कल्पनाचा गौरव केला.