नंदुरबार – जिल्ह्यातील शहादा- शिरपूर रस्त्यावर हिंगणी गावाजवळ सोमवारी सकाळी शालेय वाहन आणि मालमोटार यांच्यात अपघात झाला. या अपघातात २० वर्षाच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. तर, १५ पेक्षा अधिक विद्यार्थी जखमी झाले. शालेय वाहनास मालमोटारीची मागून धडक बसल्याचे सांगितले जाते.

शहादा तालुक्यातील धुळे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागाजवळ हिंगणी गाव आहे. या गावाजवळ सोमवारी सकाळी तोरखेडा येथून शिरपूरकडे विद्यार्थ्यांना घेवून निघालेल्या शालेय वाहनाला अपघात झाला. हिंगणी गावाजवळ शालेय विद्यार्थ्यांचे वाहन आले असता शहाद्याहून शिरपूर कडे जाणाऱ्या मालमोटारीची शालेय वाहनाला जोरदार धडक बसली. या अपघातात शालेय वाहनातील चालकाचा २० वर्षाचा मुलगा प्रशांत भगवान घोरपडे याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत शालेय वाहनातील जखमी १५ विद्यार्थ्यांना बाहेर काढून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले. अपघातात जखमी झालेले विद्यार्थी हे नऊ ते १५ वयोगटातील असून ते रोज शाळेसाठी नंदुरबार जिल्ह्यातून शिरपूरकडे जात असतात. अपघातानंतर मालमोटार चालक पळून गेला. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

Story img Loader