नाशिक – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आरोग्य केंद्र उभारणीसाठी महापालिकेने शहरात १० ठिकाणी भाडेतत्वावरील जागेचा शोध सुरू केला आहे. शासकीय दवाखाना, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्र, आयुष्यमान आरोग्य मंदिर यापासून ही जागा किमान एक किलोमीटरवर असावी, हा निकष ठेवला गेला आहे. याआधी प्रगतीपथावर असणाऱ्या आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या उभारणीचे लक्ष्य अडीच वर्षात गाठता आलेले नाही. त्या केंद्रांसाठी महापालिकेने आमदार निधीतून उभारलेली सामाजिक सभागृह, विरंगुळा केंद्र, अभ्यासिका अशी ठिकाणे ताब्यात घेतल्याचे आरोप झाले होते. जागेवरून उद्भवणारे वाद टाळण्यासाठी आपला दवाखान्यासाठी भाडेतत्वावरील जागेचा पर्याय स्वीकारला गेल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनपाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला प्राथमिक आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी आपला दवाखाना आरोग्य केंद्र उभारण्यासाठी भाडेतत्वावरील जागा शोधली जात आहे. या केंद्रासाठी १० जागांची आवश्यकता आहे. त्याकरिता महापालिकेने अभिव्यक्ती स्वारस्य मागविले आहेत. आपला दवाखान्यासाठी किमान ५०० ते एक हजार चौरस फूटाची जागा लागणार आहे. तळमजल्यावर ही जागा असावी. वाहनतळासाठी जागा उपलब्धता महत्वाची आहे. रुग्णवाहिका व वैद्यकीय विभागाच्या वाहनांची केंद्रात ये-जा राहणार आहे. २४ तास पाण्याची व्यवस्था, याठिकाणी क्लिनिक, बाह्यरुग्ण तपासणी, समुपदेशन, वैद्यकीय सल्ला व प्रतिक्षा खोलीची व्यवस्था करून द्यावी लागेल, अशा अटी आहेत. या जागेला महापालिका शासनाच्या रेडीरेकनर दराच्या आधारे भाडे देईल. जागा मालकाला कुठल्याही प्रकारची अनामत रक्कम दिली जाणार नाही. ज्यांना आपली जागा भाड्याने द्यायची आहे, त्यांनी जागेसंबंधीची कागदपत्रे आरोग्य विभागाकडे सादर करावी. ताबा पावती, मालमत्ता कर, वीज देयके, इमारतीचा नकाशा, जागा रहिवासी असल्यास सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करावे, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

हेही वाचा >>>धारेश्वरच्या धबधब्यात पडून जळगावच्या तरुणाचा मृत्यू

आरोग्यवर्धिनी केंद्रांची प्रगतीही संथ

केंद्रीय आरोग्य विभागाच्या योजनेंतर्गत शहरात १०६ आरोग्यवर्धिनी केंद्र मंजूर झाले. त्यासाठी महापालिकेला १५ कोटींचा निधी उपलब्ध झाला होता. या केंद्रांसाठी आमदार निधीतून उभारलेली सामाजिक सभागृहे, विरंगुळा केंद्र, अभ्यासिका आणि तत्सम ठिकाणे महापालिकेकडून ताब्यात घेऊन ती गोठविली गेल्याचे आरोप झाले होते. आरोग्य वर्धिनी केंद्रांच्या उभारणीसाठी या वास्तू ताब्यात घेण्यात आल्या. मात्र, ही कारवाई करताना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित संस्थांनाही अंधारात ठेवल्याचे आक्षेप घेतले गेले होते. स्वत:च्या जागा ताब्यात घेऊनही महानगरपालिका आजवर सर्व आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित करू शकलेली नाही. दीड वर्षात केवळ निम्म्याहून कमी म्हणजे ४७ केंद्र पूर्ण करणे शक्य झाले आहे. प्रारंभी या योजनेचे काम अतिशय संथ होते. त्यावरून तत्कालीन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मनपा प्रशासनावर ताशेरे ओढले होते. त्यानंतर मनपाने उर्वरित १०५ केंद्रांच्या उभारणीसाठी मनपाच्या अधिकारातील जागा शोधण्याचे काम हाती घेतले. या योजनेत पहिली अट अस्तित्वातील जागेचा वापर करण्याची आहे. त्यामुळे महानगरपालिकेला स्वत:च्या वास्तू ताब्यात घेण्याशिवाय पर्याय नव्हता. प्रशासनाने मनपाच्या अखत्यारीतील, अधिकार असणाऱ्या वास्तुंचा शोध घेतला. काही जागा अनधिकृतपणे वापरात होत्या. त्याही ताब्यात घेण्यात आल्या. सध्या ३० आरोग्यवर्धिनी केंद्रांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच ती कार्यान्वित होतील, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Search for leased premises from nashik municipal corporation for your hospital nashik amy
Show comments